महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘काय ते जुनं’ आणि ‘धोंड’ नाटकाची यशस्वी घोडदौड

रत्नागिरी: २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात रत्नागिरीच्या बालकलाकारांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लब येथे ५ जानेवारी ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण ४९ प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीतील दामले विद्यालय नगर परिषद शाळा क्रमांक १५ च्या ‘काय ते जुनं’ या बालनाट्याने तृतीय क्रमांक पटकावून अंतिम फेरी गाठली आहे. या नाटकासाठी अर्णव सरपोतदार याला अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र, तर शहबाज गोलंदाज यांना दिग्दर्शनासाठी द्वितीय आणि निरंजन सागवेकर यांना नेपथ्यासाठी द्वितीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

याच केंद्रावर रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलने सादर केलेल्या ‘धोंड’ या नाटकानेही वैयक्तिक पारितोषिकांमध्ये बाजी मारली आहे. या नाटकातील बालकलाकार विदुला मुळ्ये हिला उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले, तर संगीत दिग्दर्शनासाठी हर्ष नागवेकर याला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. याच नाटकातील आप्पा गावडे यांना संगीत दिग्दर्शनाचे तृतीय पारितोषिक मिळाले आहे.

कोल्हापूर केंद्रावरील निकालात ‘ठोंब्या’ (अभिरुची, कोल्हापूर) या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला असून, ‘चेटकिणीच्या बंगल्यात’ (अलंकार कला अकादमी, कोल्हापूर) या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले. या सर्व विजयी नाटकांची निवड आता अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेचे परीक्षण श्री. गिरीश भुतकर, श्री. हनुमान सुरवसे आणि श्रीमती वैदेही चवरे यांनी केले. या यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्या संस्था व कलाकारांचे अभिनंदन केले आहे.