महाड: ‘एम्बायो’ कंपनीत भीषण आग

महाड  :

महाड औद्योगिक वसाहतीमधील ‘एम्बायो’ या बल्कड्रग फार्मा कंपनीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे लोट आणि धुराचे लोट आकाशात उसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने, अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एम्बायो कंपनीच्या ‘इम्फ्यूअर’ विभागात गुरुवारी दुपारपासून मेंटेनन्सचे काम सुरू होते. वेल्डिंगच्या सहाय्याने नट-बोल्ट तोडण्याचे काम सुरू असताना सायंकाळी ६:४५ च्या सुमारास वेल्डिंगची ठिणगी खाली सांडलेल्या केमिकलवर पडली. रसायन असल्याने आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाला आणि धुराचे काळे लोट पाहून औद्योगिक वसाहतीमधील इतर कंपन्यांमधील कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.

आग लागताच कंपनीतील फायर सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच महाड औद्योगिक वसाहत आणि महाड नगरपालिकेचे एकूण ४ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत सुदीप देबनाथ आणि शंतनू हे दोन कामगार जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर सुभाष काटे यांनी दिली.