वेंगुर्ले : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हयातील वेंगुर्ला तालुक्यातील वकील ॲड. नारायण उर्फ श्याम जनार्दन गोडकर यांचा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांजकडून ज्येष्ठ अधिवक्ता म्हणून मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांचे हस्ते व भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंदशेखर, भारताचे अतिरीक्त सॉलिसिटर ॲड. अनिल सिंग, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे, गोव्याचे महाधिवक्ता ॲड. देविदास पांगम, बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. हर्षद निचाळकर, उपाध्यक्ष ॲड. जयत जायभाये, बार कोन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर ट्रेनिंग अॅकॅडमिचे समन्वयक व उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर, तळोजा येथील ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. तळोजा येथील सदरहू अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे हस्ते पार पडले. सदरहू उद्द्घाटन प्रसंगी सिधुदुर्ग जिल्हयातील नामांकीत व प्रसिद्ध वकील ॲड. नारायण उर्फ श्याम जनार्दन गोडकर यांचा सन्मान करणेत आला. ॲड. गोडकर हे सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये गेली ४० वर्षे वकीली व्यवसाय करीत असून त्यांचे कायदे-व्यवस्थेसंदर्भातील योगदान हे अतुलनीय अशा स्वरुपाचे आहे. त्यांचे ज्ञान, प्रामाणिकपणा व उच्च नैतिकता यासह केलेले समर्पित कार्य हे दिपस्तंभ असून वकीलांच्या नव्या पिढीला प्रेरणा मिळेल अशी त्यांची भविष्यातील दिर्घ व यशस्वी कारकीर्द असल्यामुळे त्यांचा ज्येष्ठ अधिवक्ता (सिनियर ॲडव्होकेट) म्हणून सत्कार करणेत आला. यामुळे ॲड. श्याम गोडकर यांचे विशेषतः वकील वर्ग, अन्य सामाजिक संस्था व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.











