शिरगाव येथे मतदान जनजागृती
शिरगाव (प्रतिनिधी) – शिरगाव येथील आठवडा बाजाराच्या दिवशी प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण केली.
या पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचा हक्क व त्याचे महत्त्व, निर्भय व निपक्ष मतदानाची गरज तसेच मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. “माझे मत, माझा अधिकार” या संदेशातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, महसूल सहाय्यक पूर्वाश्री आचरेकर, शिक्षक अरविंद धुर्वे, प्रदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत प्रदीप कदम यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमाला बाजारपेठेतील व्यापारी, नागरिक व मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवगड पंचायत समितीच्या तालुका समन्वयक सीमा बोडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिरगाव ग्रामपंचायत अधिकारी मंगेश साळसकर यांनी केले.













