कणकवली तालुक्यात सरासरी ६० टक्के मतदान

३९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमध्ये बंद : मतदान प्रक्रिया शांतेतत
कणकवली : कणकवली तालुक्यात जिल्हा परिषदच्या सहा व पंचायत समितीच्या दहा मतदारसंघांतून निवडणूक लढविणाºया ३९ उमेदवारांचे भवितव्य शनिवारी मतदान यंत्रात बंद झाले. तालुक्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. ११८ मतदान केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. तालुक्यात सरासरी ६० टक्के मतदान झाले.
कणकवली तालुक्यात ११८ मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान झाले. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९.३० वाजेपर्यंत सरासरी ११.१८ टक्के मतदान झाले होते. दुपारी ११.३० वाजेपर्यंत २७.६१ सरासरी टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत सरासरी ४१.९८ टक्के, दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ५०.७० टक्के मतदान झाले होते. दिवसभर झालेल्या मतदानाचा ओघ पहाता सायंकाळी ५.३० वाजता मतदानाचा कालावधी संपेपर्यंत सरासरी सुमारे ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तालुक्यातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे सायंकाळी पुन्हा कणकवली तहसील कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये जमा करण्यात आली. या प्रक्रियेमुळे शेवटची मतदानाची नेमकी आकडेवारी समजू शकली नाही. मतदान प्रक्रियेवर अधिकारी दिवसभर लक्ष ठेवून होते. अनेक गावातील वृद्ध तसेच दिव्यांग व्यक्तींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. राजकीय पक्षांनी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. तर ठिकठिकाणी लावलेल्या बुथवरही पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती.

तालुक्यातील ६ जि. प. गटांसाठी १३ उमेदवार तर १० पं. स. गणांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. सोमवारी ९ फेबु्रवारी या उमेदवारांच्या भवितव्याचा फैलसा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, खारेपाटण, जानवली जि. प. गटातील भाजपचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहे. तर बिडवाडी, वरवडे, हरकुळ बुद्रुक, नाटळ, जानवली, नांदगाव पं.स. मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.