मतदार हैराण; पूर्ण झालेल्या मतपेट्या मुख्य स्थळी रवाना
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्रात झालेल्या बिघाड, त्यामुळे खोळंबलेली मतदान प्रक्रिया आणि चिपळूणमध्ये भरारी पथकाला सापडलेली 68 हजाराची रक्कम यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळाला. ईव्हीएममध्ये सातत्याने बिघाड होत होता आणि अनेक ठिकाणी या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा नाराजीचा सूर दिसून आला. मतदारांना बराचवेळ रांगेत उभे राहावे लागले. त्यामुळेच काही ठिकाणी मतदान प्रक्रिया साडेपाच वाजल्यानंतर सुद्धा उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान दुपारी साडेतीन वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 47.38% इतका मतदान झालं. ही आकडेवारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कदाचित 57% पेक्षा जास्त होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली तेथून निवडणूक कर्मचार्यांनी तालुक्याच्या मुख्य ठिकाणी ईव्हीएम मशीन जमा करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. आलेल्या कर्मचार्यांचे रत्नागिरीमध्ये गुलाबाचे पुप्ष देऊन स्वागत करण्यात आले .












