कुडाळ तालुक्यातील पळसेवाडी येथील श्री गजानन महाराज ध्यानमंदिर भाविकांचे श्रद्धाकेंद्र

भाविकांची वाढती मांदियाळी

स्वप्निल कदम :-कुडाळ

भक्ती जिथे असते, तिथेच परमेश्वराचा मार्ग सापडतो. जो भक्त मनापासून नामस्मरण करतो, त्याला परमेश्वराचे दर्शन निश्चितच होते, असा दृढ विश्वास भक्तांच्या मनात असतो. श्री गजानन महाराजांच्या नामाचा अखंड जप, त्यांच्या भक्तीत तल्लीन होऊन आत्मशांती आणि समाधीचा अनुभव घेण्यासाठी भाविकांचा मोठा ओढा कुडाळ तालुक्यातील बिबवणे गावच्या पळसेवाडी येथील श्री गजानन महाराज ध्यानमंदिर येथे पाहावयास मिळतो.

*प्रकट दिन उत्सवाची पंधरा वर्षांची परंपरा*

मागील पंधरा वर्षांपासून बिबवणे पळसेवाडी येथे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तीभावात साजरा केला जात आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. सुरुवातीला विजय ग्रंथ पारायणाने सुरू झालेली ही साधना कालांतराने अधिक व्यापक होत गेली.

*निसर्गाच्या कुशीत वसलेले ध्यानमंदिर*

आज निसर्गाच्या कुशीत, पूर्णपणे शांत व चैतन्यदायी वातावरणात उभारलेले श्री गजानन महाराजांचे हे ध्यानमंदिर भाविकांना आकर्षित करत आहे. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच एक वेगळेच आध्यात्मिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. येथे असलेली सध्याची श्री गजानन महाराजांची मूर्ती एका भक्ताने पंढरपूर येथून आणून दिलेली आहे. अनेक देवतांची प्रतिष्ठापना

पळसेवाडी येथील या मठामध्ये श्री गजानन महाराज ध्यानमंदिरासोबतच श्री गणपती मंदिर, श्रीराम पंचायतन, मूळ पुरुष, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, आई गजांत लक्ष्मी आदी देवतांची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या भाविकांची सेवा सेवेकरी मंडळी अत्यंत प्रेमाने, आदराने व भक्तीभावाने करतात.

नियमित धार्मिक विधी व पूजा

दरवर्षी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दत्त याग, गणेश याग, गणेश-लक्ष्मी याग, महारुद्र, नवचंडी यांसारखे धार्मिक विधी पार पडतात. तसेच प्रत्येक महिन्याच्या विनायक चतुर्थीला सत्यविनायक महापूजा व प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण महापूजा येथे भक्तिभावात संपन्न होते. मठामध्ये कोणताही भेदभाव न ठेवता सर्व भाविकांना समान वागणूक दिली जाते.

गणेशोत्सव काळात दरवर्षी २१ महापूजा पार पडतात. मठातील शाडु मातीपासूनबनविलेली श्री गणपतीची मूर्ती वर्षभर दर्शनासाठी उपलब्ध असते.

 

*९०० किमी अनवाणी पायी शेगाव वारी*

 

प्रकट दिन उत्सवापूर्वी सुमारे ९०० किलोमीटरचा प्रवास अनवाणी पायाने केला जातो. पळसेवाडी येथून सुरू होणारी ही वारी सावंतवाडी, दानोली, आजरा, निपाणी, नरसिंहवाडी, मिरज, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर, येरमाळा, मेंडकर, खामगाव मार्गे शेगाव येथे पोहोचते. दररोज सुमारे २५ ते ३० किलोमीटर पायी चालत भक्तजन मोठ्या श्रद्धेने या वारीत सहभागी होतात.

भाविकांच्या श्रद्धेला बळ

मनोभावे सेवा केल्यानंतर परमेश्वराचे दर्शन होतेच, असा ठाम विश्वास भाविकांमध्ये निर्माण झाला आहे. अनेक भाविक आपल्या अडचणी, समस्या घेऊन येथे येतात. श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांच्या समस्या दूर होऊन समाधान लाभत असल्याचा अनुभव भाविक सांगतात. त्यामुळे दिवसेंदिवस या ध्यानमंदिरातील भाविकांची संख्या वाढत आहे. दर गुरुवारी येथे भजन व नामस्मरणाचा कार्यक्रम भक्तिभावात पार पडतो.

सेवेकऱ्यांचा सक्रिय सहभाग

अनेक सेवेकरी जिल्हा सह गोवा राज्यातील भक्तगन या भक्तीसेवेत सहभागी आहेत. आपापले उद्योग, व्यवसाय व नोकरी सांभाळूनही हे सेवेकरी निष्ठेने सेवा देतात. मठात दररोज नित्य पूजा-विधी पार पडतात. विशेष म्हणजे तरुण सेवेकरी मंडळींचा सहभाग येथे मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

 

रस्ते व रेल्वे ट्रॅकची गंभीर समस्या

मठाचा परिसर अतिशय निसर्गरम्य असला तरी मठाकडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या अत्यंत बिकट आहे. मठाजवळून कोकण रेल्वेचा ट्रॅक जात असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. या मंदिरापर्यंतचा रस्ता विकसित होणे तसेच रेल्वे ट्रॅकवर ब्रिज किंवा अंडरग्राउंड बोगदा उभारणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्याने हा विषय तातडीने मार्गी लागावा, अशी मागणी भाविकांकडून जोर धरू लागली आहे.