रत्नागिरी तालुक्यावर ना. उदय सामंत यांचे एकहाती वर्चस्व ! शिवसेना भाजप महायुतीचा भगवा फडकला!!

उबाठा ग्रामीण भागातूनही हद्दपार

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राहिलेली कसर पूर्ण करत राज्याचे उद्योग मंत्री तथा पालक मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यामध्ये एक हाती जिल्हा परिषद गट आणि गणांवर वर्चस्व मिळवले.

रत्नागिरी हा राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी तालुका हा बालेकिल्ला! याच रत्नागिरीतील हातखंबा या त्यांच्या होम पीचवर बंडखोरी झाली होती. त्याच वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उदय बने यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली होती. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील दहा गटांच्या निवडणुकीकडे सर्वांचाच लक्ष लागून राहिलं होतं. उर्वरित जागा ह्या निवडून येतील असा विश्वास सुरुवातीपासूनच सर्वांना वाटत होता. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून कोणतेही आव्हान निर्माण करण्यात आलं नव्हतं. मात्र हातखंबा गटातील बंडखोरी आणि उदय बनेंचा अनुभव या दोन गोष्टी इथे काही चमत्कार करतात का याबाबतच सर्वांचेच लक्ष लागून राहिलं होतं.

मात्र गेल्या 25 ते 26 वर्षातील मतदारसंघातील असलेली पकड आणि तरबेज राजकारणी असलेल्या ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील दहाच्या दहा जिल्हा परिषद गट आणि वीस पंचायत समिती गणांवर शिवसेना भाजपा युतीचा भगवा फडकवला आहे. 10 जिल्हा परिषद गटातील सर्वच्या सर्व जागांवर शिवसेना उमेदवार निवडून आले आहेत. यातील गोळप गटाकडे तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र शिवसेनेचे पहिल्या मुशीतील ज्येष्ठ नेते उदय बने यांचा मात्र पराभव करण्यात शिवसेनेला यश आले. सुरुवातीचे काही फेऱ्यांमध्ये उदय बने यांनी आपले आव्हान निर्माण केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी नंदा मुरकर यांनी आघाडी घेतली आणि तेथून निवडून आले. हा शिंदे शिवसेनेचा एक मोठा विजय मानला जातो.

त्याच वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातून शिवसेनेमध्ये आलेले परशुराम कदम यांना ऐनवेळेला हातखंबा गटातून शिवसेनेने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. यामुळे तिथल्या काही शिवसैनिकांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासमोर असलेला उमेदवार सुद्धा नवखा होता. त्यामुळे परशुराम कदम यांचा विजय सहज मानला जात होता . शेवटच्या दोन फेऱ्या वगळता सर्वच फेऱ्यांवरती परशुराम कदम यांचे वर्चस्व होतं. मात्र पाली भागातील जनतेने शिवसेनेला कौल दिल्यामुळेच शिवसेनेचा उमेदवार परशुराम कदम यांचा पराभव करून अवघ्या काही मतांना निवडून आला.

यामुळेच रत्नागिरी तालुक्यावर ना. उदय सामंत यांचाच वर्चस्व असल्याचे सिध्द झाले असून शिवसेना आणि भाजपा महायुतीचा भगवा येथे फडकलेला आहे. तर शिवसेना शिंदे गटालाही इथल्या जनतेने स्वीकारले असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झालं आहे.