ज्येष्ठ नमन कलावंत विठ्ठल नायनाक यांची लाभली उपस्थिती
चिपळूण (वार्ताहर ): महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालन कार्य विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या खेड येथील नमन महोत्सवाचे उद्घाटन खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला व असगणी येथील जेष्ठ नमन कलावंत विठ्ठल नायनाक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या माध्यमातून गेली तीन वर्ष नमन महोत्सवाचे आयोजन करून नमन लोककला नव्या रंगांमध्ये रसिकांच्या समोर आणण्याचे काम शासनाचा सांस्कृतिक विभाग करत आहे. रत्नागिरी, चिपळूण नंतर यावर्षी नमन महोत्सव खेड येथे होत आहे. या नमन महोत्सवाचे उद्घाटन सोमवार दिनांक ९ रोजी रात्री ७.३० वाजता खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला आणि ज्येष्ठ नमन भारुड आणि नाच कलावंत विठ्ठल गणपत नायनाक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम दीपप्रज्वलन आणि नटराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. हा नमन महोत्सव होण्यासाठी नमन लोककला संस्था रत्नागिरी जिल्हा व नमन लोककला संस्था मुंबई या दोन्ही संघाचे सहकार्य लाभत असल्याने अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी सांगितले की, आम्ही लहानपणापासूनच नमन कला बघत आले आहे. इथले लोक कलावंत ग्रामीण भागातले असतात. रात्री आपल्या चेहऱ्याला रंग लावून लोकांची करमणूक करतात. आपल्याला सुद्धा ही नमन कला फार आवडते. खेडमध्ये प्रथमच नमन महोत्सव होत आहे ही आमच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बाब आहे. इथल्या रसिकांना या कार्यक्रमाचे निश्चितच आस्वाद घेता येईल. या नमन महोत्सवासाठी आमच्या नगर परिषदेचे सहकार्य कायम राहील. असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ कलावंत विठ्ठल नायनाक यांनी सुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना सांगितले की, गेली अनेक वर्ष नमन भारुड आणि शक्ती तुरा कला जोपासताना या लोककलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आपण निश्चितच परिश्रम घेतले आहेत. या नमन कलेने माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातील कलावंताला कलाकार अशी ओळख दिली. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या कलेत आपले योगदान देत राहीन, आहे त्यांनी सांगितले.
उद्घाटन नंतर नमन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री काळेश्वरी नमन मंडळ मुंबई यांनी आपले बहारदार सादरीकरण करत रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमातील स्त्रीपात्र आणि कलाकार यांनी उत्तम अभिनय साकारत आपल्यातील या कलेविषयी असणारे प्रेम आत्मियता दाखवून दिली. त्यानंतर नवलाई नमन मंडळ निवळी रत्नागिरी यांनी आपले सादरीकरण करताना गणेश दर्शन आणि गणेश कथेमध्ये गजासूर, टिपरासुर आणि भस्मासुर या दैत्य सुरांची कथा दाखवत रसिकांवरती छाप पाड. या तिन्ही दैत्यांच्या भूमिका साकारणाऱ्या कलावंतांनी अगदी पौराणिक कथेतील वेशभूषा करत सुंदर अभिनय साकारला होता. त्यांचा कार्यक्रम पाहताना रसिक मंत्रमुग्ध झाले.
नमन महोत्सव उद्घाटन कार्यक्रमाला खेड नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, अखिल नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, नमन लोककला संस्था रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पी. टी. कांबळे, जेष्ठ नमन कलावंत विठ्ठल नायनाक, नमन लोककला रत्नागिरी जिल्हा खजिनदार ॲड. भाई कुळे, ज्येष्ठ कलावंत श्रीधर खापरे, नमन लोककला संस्था मुंबई महासचिव शाहिद खेरटकर, नमन तालुका चिपळूण अध्यक्ष भिकाजी भुवड, नमन तालुका खेड अध्यक्ष संजय बुरटे, श्री कुंदन, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक प्रतिनिधी नंदकिशोर जुवेकर त्यांचे सहकारी असे अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते.











