चिपळूण (प्रतिनिधी) : ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने मुंबई येथे आयोजित उल्लेखनीय काम करणाऱ्या लेखक आणि पत्रकार यांच्या पुरस्कार सोहळ्यात तालुक्यातील खेरशेत गावचे सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी मिलिंद कदम यांना अजेय लेखणी पुरस्काराने गौरविण्यात आले.
समाजातील तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा आणि समाजासाठी झटणाऱ्या नि:स्वार्थ समाजसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
मिलिंद कदम शासकीय सेवा बजावत असतानाच सामाजिक कार्यातदेखील झोकून काम करीत आहेत. विविध विषयांवर परखड लिखाण करीत ते समाजातील प्रश्नांना वाचा फोडत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ च्या वतीने त्यांचा अजेय लेखणी या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक विसुभाऊ बापट, साहित्यिक अरुण म्हात्रे यांच्या हस्ते मिलिंद कदम यांना अजेय लेखणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आर्यारवी एंटरटेनमेंटचे सर्वेसर्वा महेश्वर तेटांबे, ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक प्रभाकर तोडणकर यांच्यासह मान्यवर यांचे उपस्थितीत मिलिंद कदम यांना गौरविण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मिलिंद कदम यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांचे अभिनंदन करीत आहेत. चिपळूणच्या सुपुत्राला अजेय लेखणी पुरस्काराने गौरवण्यात आल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.













