कणकवलीत शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि ऐतिहासिक प्रसंग सादरीकरण स्पर्धा

मराठा शिक्षक समाज बांधव, कणकवलीच्या वतीने आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) :
शिवजयंतीचे औचित्य साधून मराठा शिक्षक समाज बांधव, कणकवलीच्या वतीने विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या पूर्व नियोजनासाठी नुकतीच एक सभा पार पडली असून, यामध्ये उपस्थित सर्व समाज बांधवांनी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि ऐतिहासिक प्रसंग सादरीकरण स्पर्धा घेण्याचे एकमताने निश्चित केले आहे.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ही स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता कणकवली पंचायत समिती कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न होईल. ही स्पर्धा तीन गटांत घेतली जाणार आहे. पहिल्या गटात इयत्ता १ ली ते ४ थी मधील विद्यार्थी ‘शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग’ या विषयावर ४ ते ५ मिनिटे बोलतील. दुसऱ्या गटात इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थी ‘राजमाता जिजाऊ किंवा स्वराज्यरक्षक शंभूराजे’ या विषयावर ५ ते ६ मिनिटे आपले विचार मांडतील, तर तिसऱ्या गटात इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी ‘लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती’ हा विषय असून त्यांना ६ ते ७ मिनिटे वेळ दिला जाईल. प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रथम १००० रुपये, द्वितीय ७०० रुपये आणि तृतीय ५०० रुपये अशी रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल.

जिल्हास्तरीय ऐतिहासिक प्रसंग सादरीकरण स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंगांचे दर्शन घडविण्यासाठी या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इयत्ता १ ली ते ९ वी मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी असून प्रत्येक संघात किमान ५ व कमाल १० विद्यार्थी असणे आवश्यक आहे. सादरीकरणासाठी १० ते १२ मिनिटांचा वेळ दिला जाईल. स्पर्धेचे स्वरूप दोन टप्प्यांत असेल. पहिल्या टप्प्यात इच्छुकांनी आपल्या प्रसंग सादरीकरणाचा १०-१२ मिनिटांचा व्हिडिओ १६ फेब्रुवारी पर्यंत आयोजकांकडे पाठवायचा आहे. या व्हिडिओंचे परीक्षण करून अंतिम ५ संघांची निवड केली जाईल.

निवड झालेल्या ५ संघांना १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रत्यक्ष सादरीकरण करावे लागेल. यातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ३०००, २५०० आणि २००० रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल, तर उर्वरित दोन संघांना सन्मानचिन्ह दिले जाईल. ऐतिहासिक अचूकता, अभिनय, संवाद कौशल्य आणि वेशभूषा या निकषांवर स्पर्धेचे मूल्यमापन केले जाईल. नोंदणी व संपर्क वक्तृत्व स्पर्धेसाठी आणि ऐतिहासिक प्रसंग सादरीकरण स्पर्धेच्या नोंदणीसाठी सुशांत मर्गज (९४२०२०६३२६ / ९६०४९२७२१७), प्रशांत दळवी (९०४९८६१२५८ / ९४२०६५६७६१) आणि श्यामसुंदर सावंत (९४२१६२४४७५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मराठा शिक्षक समाज बांधव, कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.