उबाठा सेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचा राजिनामा

रत्नागिरी : 
जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये रत्नागिरी तालुक्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाल्याने, या पराभवाची जबाबदारी स्वीकारत तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजिनामा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे पाठवला आहे. यामुळे शिवसैनिकांमध्येही खळबळ माजली आहे.

शिवसेना उबाठामधून अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु सर्वसामान्य शिवसैनिक आजही ठाकरेसोबत असल्याचे नुकत्याच लागलेल्या निकालावरुन दिसून आले. ठाकरेंचे अनेक उमेदार काही शे मतांनी पराभूत झाले. परंतु एकतर्फी लढत होऊ दिली नाही. जवळपास 45 हजारहून अधिक मते ठाकरेंच्या सेनेने रत्नागिरी तालुक्यात मिळवली.

तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेखर घोसाळे यांनी तालुक्यात चांगल्या पध्दतीने बांधणी करण्यास सुरुवात केली होती. पदाधिकारी व शिवसैनिकांना विश्वासात घेत ठाकरेंच्या या लढवय्या कार्यकर्त्यांने तालुक्यात शिवसेनेची होणारी पडझड थांबवली होती. मात्र जि.प. व पं.स.तीचा पराभव जिव्हारी लागल्याने शेखर घोसाळे यांनी आपल्या पदाचा राजिनामा जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्याकडे पाठवून दिला आहे.

या राजिनाम्यानंतर ते म्हणाले की आपण ठाकरे प्रेमी असून यापुढे शिवसैनिक म्हणून काम करु मात्र कोणत्याही अन्य पक्षात जाण्याचे आपल्या मनातही येणार नाही. सर्वसामान्य शिवसैनिक तालुक्यात अजून ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच पक्षाचे काम प्रामाणिक करु असेही त्यांनी सांगितले.