पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा आमदार निलेश राणे यांचा प्रस्ताव !
खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून दरडोई उत्पन्न वाढवण्यावर भर.
पर्यटन जिल्ह्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवणार.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.
ओरोस: सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आराखडा ६०० कोटींच्या पुढे नेल्याबद्दल आमदार नीलेश राणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला. या वाढीव निधीमुळे जिल्ह्याच्या विकासकामांना मोठी गती मिळणार असून, प्रशासनाने आता वेगाने कामाला लागावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
या प्रस्तावाला उत्तर देताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, “खासदार नारायण राणे यांच्या विकासाच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
चौकट
पर्यटनातून रोजगारावर भर
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा मिळणे आवश्यक आहे. “पर्यटन वाढले तरच प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. स्थानिकांना सेवा क्षेत्रांतून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांगीण सुविधा देण्यावर आमचा भर राहील,” असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
चौकट
‘आता अधिकाऱ्यांनी कामाला लागावे’ – नीलेश राणे
निधी मंजूर झाला असला तरी त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे, असे मत आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केले. “अधिकाऱ्यांनी कामाची कमाल मर्यादा (Deadlines) ठरवून घ्यावी आणि प्रत्यक्ष जमिनीवर कामे सुरू करावीत. विकासाचा हा निधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.











