‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन अल्पवयीन मुलींची सुटका

रत्नागिरी:
मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत ही यशस्वी कारवाई करण्यात आली असून, अवघ्या २४ तासांच्या आत या मुलींना सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.

वाकोला पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील दोन मुली नेत्रावती एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तातडीने रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर रवाना करण्यात आले.

रेल्वे स्टेशनवर पोहोचलेल्या पोलीस पथकाने नेत्रावती एक्सप्रेसमध्ये तपासणी केली असता, दोन्ही मुली मिळून आल्या. या दोन्ही मुलींना सुरक्षितरीत्या वाकोला पोलीस ठाण्याच्या (बृहनमुंबई) ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय आंबेकर, दिपराज पाटील आणि महिला पोलीस अंमलदार स्वाती राणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.