भाऊ भोगले याना य. बा. चोपडे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मसुरे | झुंजार पेडणेकर :बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने देण्यात येणारा य. बा. चोपडे आदर्श शिक्षक पुरस्कार वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल IBT विभागाचे प्रमुख निदेशक केशव उर्फ भाऊ भोगले यांना जाहीर झाला आहे.

भाऊ भोगले गेली 14 वर्षे श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या शाळेत IBT विभागाचे प्रमुख समादेशक म्हणून काम पाहत आहेत. माळगाव बागायत येथील रहिवासी असून शेतकरी गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. शालेय शिक्षण आर. पी. बागवे येथे झाले असून टेक्निकल शिक्षण मुंबई येथे झाले.

१९९९ ते २००२ पर्यंत त्यांनी आर. पी. बागवे हायस्कूल मध्ये इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी हे विषय ११ वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना शिकवले व ऑन जॉब ट्रेनिंग देण्याचे काम केले. त्यामुळे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी व व्यवसाय करू लागले.

गेली १४ वर्षे वडाचापाट हायस्कूल येथे

IBT विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना सलग 10 वर्षे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम किंवा दुसरा क्रमांक मिळवून दिला आहे. IBT मॉडेल स्कूल दर्जा शाळेला मिळवून दिला आहे.

मास्टर ट्रेनर म्हणून पुणे शहरातील ८० शिक्षकांना IBT विषयाचे ट्रेनिंग दिले. अनेक शाळात IBT विभाग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने हा पुरस्कार डॉ. संजय खोत, श्री. अभिमन्यू कवठणकर, श्री. पूर्णानंद नाडकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत 14 फेब्रुवारी 2026 रोजी

सकाळी ९ वाजता श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचा पाट येथे देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन बॅ नाथ पै सेवांगणच्या वतीने करण्यात आले.