राजापूर (वार्ताहर): श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या पवित्र पादुका पालखीचे सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजापूर येथे आगमन होणार असून साईनगर, कोदवली येथील सुनील विठोबा सातोसे यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाची पालखी दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता साईनगर येथे पोहोचेल. सकाळी ८:३० ते १०:३० या वेळेत श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन सर्व भक्तांसाठी खुले राहणार आहे. या वेळेत जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
पालखीचे वास्तव्य साईनगर एसटी डेपो नजीक, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील श्री. सुनील विठोबा सातोसे यांच्या घरी राहणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी शिस्त, स्वच्छता आणि भक्तिभाव राखून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने व आरतीने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून अनेक भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी सुनील सातोसे, बाळू तानवडे, विवेक ऊर्फ पिंट्या गुरव तसेच अनिश भाटकर यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, स्वामीभक्त कै. प्रकाश कातकर यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. राजापूर परिसरातील तसेच आजूबाजूच्या गावांतील सर्व स्वामीभक्तांनी या पवित्र पालखी सोहळ्यास उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Home महत्वाच्या बातम्या राजापूर येथे १६ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ पालखीचे आगमन...











