एसटीसह दोन कारची धडक
सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यातील माजगाव तांबळगोठण येथील बसस्टॉपवर शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. प्रवाशांना उतरवण्यासाठी थांबलेल्या एसटी बसला एका कारने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. सुदैवाने, या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास माजगाव तांबळगोठण बसस्थानकावर प्रवाशांना उतरवण्यासाठी एक एसटी बस थांबली होती. या बसच्या मागे एक कार उभी होती. याच वेळी मागून येणाऱ्या एका भरधाव कारने उभ्या असलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, मधली कार जोराने पुढे सरकली आणि थेट एसटी बसच्या मागील भागात जाऊन घुसली. या साखळी अपघातात दोन्ही कारच्या पुढच्या आणि मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.
प्रवासी सुखरूप, पोलिसांत नोंद नाही
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये आणि दोन्ही कारमध्ये प्रवासी होते, मात्र सुदैवाने सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
तडजोडीने मिटला वाद
या अपघाताबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता, संबंधित वाहनधारकांनी आपापसात चर्चा करून हा वाद तडजोडीने मिटवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या घटनेची अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही.













