जिल्ह्यातील बागायतदारांना सिंधुदुर्ग बँकेचा दिलासा! 

पॅक हाऊससाठी ८०% पर्यंत कर्जसहाय्य.

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. फार्म गेट पॅक हाऊस उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ८० टक्क्यांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचा निर्णय सिंधुदुर्ग बँकेने घेतला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या माहितीसह प्रस्ताव नजीकच्या शाखेत सादर करावेत, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची सभा संपन्न झाली. या सभेला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे व जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२५–२६ अंतर्गत फार्म गेट पॅक हाऊस उभारणीवर चर्चा या सभेत करण्यात आली. सिंधुदुर्गातील जास्त पाऊस व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन आराखड्यात बदलांची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले होते. व याबाबत शेतकऱ्यांकडून बदलांसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचेकडे निवेदन सादर करण्यात आले होते. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे येथे सादर केल्याची माहिती नाईकनवरे यांनी दिली.

मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल होईपर्यंत शेतकऱ्यांच्या अर्जांना मुदतवाढ देण्याच्या सूचना अध्यक्ष दळवी यांनी दिल्या.या विषयावर पालकमंत्रीं नितेश राणे यांचेकडेही लेखी निवेदन देऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले.

पॅक हाऊस उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या ८०% पर्यंतचा कर्ज पुरवठा बँकेकडून केला जाईल यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या माहितीसह प्रस्ताव लवकरात लवकर बँकेच्या नजीकच्या शाखेत सादर करावेत. या संदर्भात काही माहीती आवश्यक असल्यास बँकेच्या प्रधान कार्यालयामधील नोडल ऑफिसर श्री. आनंद टेमकर मोबा. नं. ९४०३३६६२७० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी यांनी केले.