▪️मालवणच्या चालकांचा अनोखा भक्तीविष्कार
मसुरे | झुंजार पेडणेकर :
एसटी म्हणजे फक्त एक वाहन नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. पंढरपूरची वारी असो, गणपती-दिवाळीचा सण असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाणे असो या प्रत्येक आठवणीत ‘लाल परीचा’ वाटा मोठाअसतो.नुकत्याच झालेल्या आंगणेवाडी जत्रोत्सवात सिंधुदुर्ग एसटी विभागाच्या तब्बल 135 बसेस यात्रेकरू भाविकांच्या सेवेसाठी होत्या. या सर्व एसटी बसेस मध्ये मालवण एसटी आगाराच्या दोन एसटी बसेस या वेगळ्या दिसत होत्या. आगाराचे चालक सुहास साळकर आणि अनिल चिरमुले यांनी या एसटी बसेस आकर्षक पद्धतीने सजविल्या असल्याने प्रवाशांसाठी विशेष आकर्षण ठरल्या. “ज्या एसटीमुळे आपण जनतेची सेवा करतो, तिच्यासाठी काहीतरी वेगळे करावे,” या भावनेतून चालकांनी हा उपक्रम राबवला.
गोळवण कुंभादेवीवाडी येथील अनिल कृष्णा चिरमुले हे नोव्हेंबर 2019 पासून सिंधुदुर्ग विभाग – मालवण आगार मध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. या वर्षी 26 जानेवारीला पाच वर्ष सुरक्षित सेवे बद्दल त्याचा सन्मान झाला आहे. गाडी सजवायची संकल्पना त्यांची असली तरी घरातून गाडी सजवायला मदत केली गेली. एसटीच्या यांत्रिक वर्गाचे सहकार्य लाभले. दरवर्षी वराड – कट्टा – आंगणेवाडी असा मार्ग त्याना दिला जातो. ते स्वतः स्वामी भक्त असल्याने बसच्या समोरील बाजूने स्वामींचा फोटो आणि त्याला सभोवताली विद्युत रोषणाई तसेच गाडीच्या आतील बाजूने जत्रेचा फील यावा अशी फुलांची आकर्षक मांडणी त्यांनी केली होती. मालवण आगारातील दुसरे चालक हडी साळकरवाडी येथील सुहास साळकर यांनी सुद्धा ते चालवत असलेली बस जत्रोत्सवा दिवशी धार्मिक देखाव्याने सजविली होती. त्यांनी “संत जनाबाई आणि श्री विठ्ठल” हा देखावा दाखविला होता. तर बस सुद्धा आकर्षक रित्या सजविली होती.गेली सतरा वर्ष ते एसटीच्या नोकरीत आहेत. त्यांना सुद्धा पंधरा वर्ष सुरक्षित सेवेबद्दल एसटी कडून सन्मानित करण्यात आले आहे. जेवढी चांगली सेवा प्रवासी वर्गाला देता येईल तेव्हढी देण्याचा आम्ही कर्मचारी प्रयत्न करतो.आमच्या आगाराचे आगार प्रमुख अनिरुद्ध सूर्यवंशी, स्वप्निल गडदे, सतिश वाळके आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पण यासाठी सहकार्य लाभल्याचे चिरमुले सांगतात. आई भराडी आणि स्वामी समर्थ्यांच्या कृपेने प्रवाशांची अशीच सेवा करायची संधी मिळो असेही ते सांगतात. शहरांना जोडणारे रस्ते बरेच असतील. पण काळजाला काळजाशी जोडण्याचे काम आजही फक्त एसटीच करते. दुर्गम आणि डोंगराळ भागात जिथे खासगी वाहने जात नाहीत तिथे लाल परी धूळ उडवत दिमाखात पोहोचते. शेतकऱ्याचा शेतमाल असो किंवा विद्यार्थ्यांची शाळा, एसटीशिवाय ग्रामीण जीवन अपूर्ण आहे. त्यामुळे एसटीचे महत्व ग्रामीण जीवनात अनन्य साधारण असताना मालवण आगाराच्या या चालकानी ते चालवत असलेल्या बस आकर्षक रित्या सजवल्याने प्रवाशांसाठी आकर्षण ठरल्या.













