लांजा: कौटुंबिक वादातून सख्ख्या चुलत भावाकडून मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

लांजा: कोचरी बौद्धवाडी येथे एकाच कुटुंबातील दोन गटांतील जुन्या वादातून हाणामारी झाल्याची घटना १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दिनेश राजाराम कांबळे (४४) यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी दिनेश कांबळे आणि संशयित आरोपी कुंदन कांबळे हे सख्खे चुलत भाऊ आहेत. त्यांच्या वाडीमध्ये दोन गट असून गेल्या एका वर्षापासून त्यांच्यात वाद सुरू आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी हे बौद्धविहाराबाहेर अगरबत्ती लावण्यासाठी गेले असता, “तू कशाला अगरबत्ती लावतोस, निघून जा” असे म्हणून कुंदन कांबळे यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण व ढकलाढकल केली. यावेळी आरोपीचे भाचे निलेश जाधव आणि अजय जाधव यांनीही फिर्यादीला मारहाण करून खाली पाडले. आरोपी निलेश याने हातातील कडा काढून फिर्यादीच्या डोळ्याखाली मारून दुखापत केली. वाद सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीलाही आरोपींनी ढकलून दिले.

या प्रकरणी आरोपी कुंदन अनंत कांबळे, निलेश अनिल जाधव आणि अजय अनिल जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे