देवगड : प्रतिनिधी
हर हर महादेवाच्या नामघोषात महाशिवरात्री यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत कुणकेश्वर नगरी भक्तीभावाने फुलून गेली आहे. गेल्या दोन दिवसांत यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उद्या देवस्वाऱ्यांच्या समुद्र स्नानाने यात्रेची सांगता होणार आहे.
अमावस्या सुरू झाल्याने उद्या पहाटे पवित्र तीर्थस्नानाचा योग साधण्यासाठी असंख्य भाविकांची पावले श्री कुणकेश्वर मंदिर तीर्थस्थानाकडे वळली आहेत. काल सायंकाळपासूनच यात्रेत भाविकांचा गर्दीचा ओघ वाढत गेला असून दोन दिवसांत लाखो भाविकांनी कुणकेश्वर येथे उपस्थिती लावली आहे.
महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री देव कुणकेश्वर भेटीसाठी चार देवस्वाऱ्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये श्री देव लिंगेश्वर पावणाई देवस्थान, जानवली (कणकवली), श्री देव नागेश्वर पावणादेवी, नागवे (कणकवली) या देवस्वाऱ्या यात्रोत्सवाच्या दिवशी दाखल झाल्या होत्या. तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री पावणाई रवळनाथ देवस्थान, मालोंड-बेलाचीवाडी (मालवण) आणि श्री देव गांगेश्वर देवस्थान, नारिंग्रे (देवगड) या देवस्वाऱ्या दाखल झाल्या आहेत.
यात्रेनिमित्त कुणकेश्वर येथे दोन दिवस प्रसिद्ध भजनीबुवांचे भजन कार्यक्रम पार पडले. विविध भजन मंडळांनी शिवनामाचा गजर करत वातावरण भक्तीमय केले.
यात्रेदरम्यान बाजारपेठ तसेच समुद्रकिनाऱ्यावर विविध दुकाने थाटण्यात आली असून कळगड बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. कुणकेश्वर मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
यात्रास्थळी विविध शासकीय योजनांची तसेच आरोग्य व धार्मिक माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले आहेत. अमावस्येच्या निमित्ताने पवित्र तीर्थस्नानासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असून समुद्रात कोणताही अपघाती प्रकार घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस आणि स्वयंसेवक सतर्क आहेत.
कुणकेश्वर हायस्कूल ते एसटी स्टँड, पर्यटन संकुल परिसर तसेच मंदिराच्या मागील बाजूस तारामुंबरी-मिठमुंबरी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांचे पार्किंग करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर आदी ठिकाणांहून शिवभक्त श्री कुणकेश्वराच्या दर्शनासाठी व पवित्र तीर्थस्नानासाठी दाखल होत आहेत.
कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनामार्फत यात्रेचे नियोजन करण्यात आले असून एसटी विभागाकडून यात्रेनिमित्त जादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. उद्या दर्श अमावास्येची पर्वणी असल्याने धार्मिक विधी व तीर्थस्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असून यात्रेचा समारोप तीर्थस्नानाने होणार आहे. तथापि, भाविकांची संख्या लक्षात घेता यात्रा उद्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.












