गोठोस येथील घटना : चौकुळमधील घटनेची पुनरावृत्ती
सावंतवाडी : माणगाव तालुक्यातील गोठोस येथे विषारी आळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली आहे. सुभाष पवार (३६), शीला पवार (३०), सुप्रिया पवार (८), सावन पवार (१०) आणि चंद्रशेखर स्वामी (४०) अशी विषबाधा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास घराजवळ उगवलेली आळंबी खाल्ल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. तातडीने त्यांना माणगाव आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने, त्यांना १०८ रुग्णवाहिकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे चार दिवसांपूर्वी चौकुळ येथे घडलेल्या अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे, जिथे चार व्यक्तींना विषारी आळंबी खाल्ल्याने विषबाधा झाली होती. या पार्श्वभूमीवर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने नागरिकांना आळंबी खाताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
विषबाधा झालेल्या कुटुंबाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम आणि सुजय सावंत यांनी सहकार्य केले. पावसाळ्यात जंगली आळंबी खाणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडूनही करण्यात आले आहे.













