लांजा (प्रतिनिधी) :नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने मिळविलेल्या एकतर्फी विजयामध्ये आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व झळाळून निघाले असल्याचे येथील उद्योजक विकास शेट्ये यांनी सांगितले.
लांजा तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये चार जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समिती गणांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले होते. याबाबत बोलताना विकास शेट्ये म्हणाले की, मिळालेले घवघवीत यश हे केवळ आकड्यांचे गणित नसून, ते सक्षम नेतृत्व, जनतेशी असलेली घट्ट नाळ आणि सातत्यपूर्ण विकासकामांचे फलित आहे. या यशामागे आमदार किरण सामंत यांची दूरदृष्टी आणि प्रभावी नेतृत्व ठामपणे उभे राहते.
गेल्या काही वर्षांत लांजा मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि क्रीडा सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर आमदार किरण सामंत यांनी सातत्याने लक्ष दिले. “विकास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे” हा त्यांचा दृष्टिकोन केवळ भाषणापुरता न राहता प्रत्यक्ष कामातून दिसून आला. त्यामुळेच जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आणि त्याचेच प्रतिबिंब निवडणूक निकालात उमटले.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करताना, त्यांनी तरुणांना संधी दिली, महिलांचा सहभाग वाढवला आणि अनुभवी कार्यकर्त्यांना योग्य जबाबदाऱ्या सोपवल्या. हा समतोलच यशाची गुरुकिल्ली ठरला.
या यशामुळे आगामी काळात लांजा तालुक्याचा विकास अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. जनतेचा पाठिंबा, कार्यकर्त्यांची मेहनत आणि आमदार किरण सामंत यांचे सक्षम नेतृत्व यांची ही त्रिसूत्री लांजासाठी नक्कीच उज्वल भविष्य घडवेल, असे विकास शेट्ये यांनी सांगितले.












