उत्सव काळात भाविकांची होणारी परवड दूर होण्यास मदत होईल
राजापूर (प्रतिनिधी): समस्त राजापूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव धुतपापेश्वरच्या महाशिवरात्री रोजी झालेल्या यात्रोत्सवात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री देव धुतपापेश्वर मंदिर सुशोभिकरणाच्या कामाने या मंदिराचे व परिसराचे रूपडे पालटले आहे. राजापुरात येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना आकर्षीत करणारे असे हे तालुक्यातील श्रध्दास्थान आहे. मात्र या मंदिराकडे जाणारा अरूंद रस्ता, पार्किंगची नसलेली सोय आणि यामुळे मंदिरापासून सुमारे एक किलोमिटर लांब गाडया पार्क करून दर्शनासाठी करावी लागणारी पायपीट भाविकासाठी काहीशी अडचणीची व त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे भविष्यात भाविक व पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी या मंदिराकडे जाणारा रस्ता, पार्किंग सुविधेसह अन्य सेवा सुविधांबाबत नियोजनबध्द आराखड तयार करून यावर कार्यवाही करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
राजापुरातील ऐतिहासिक मंदिर अशी श्री देव धुतपारेश्वर मंदिराची ओळख आहे. दर सोमवारी राजापूर शहर व परिसरासह विविध भागातुन मोठया प्रमाणावर भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. तर महाशिवरात्री उत्सवाला तर दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत या मंदिराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. सुमारे ११ कोटी रूपये खर्चुन शासनाने हे काम केले आहे. या सुशोभिकरणाच्या कामामुळे मंदिर व परिसराचे रूपडे पालटले आहे. मंदिराला नवा साज आला आहे. राजापुरातील एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून हे मंदिर व परिसर नावारूपाला आला आहे.
मात्र आजही या मंदिराकडे जाणारा अरूंद रस्ता व येणाऱ्या भाविकांना गाडया पार्क करण्यासाठी नसलेली पार्किंगची सोय याचा फटका भाविकांना बसत आहे. खास करून महाशिवरात्री उत्सव काळात तर भाविकांना श्री धुतपापेश्वर मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी यातायात करावी लागत आहे. मुळातच अरूंद रस्ता, भाविकांची होणारी गर्दी व यातुन होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीचे व पार्किंगचे नियोजन केले जाते. मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी भाविकांना दरवर्षी मोफत मिनी बस सेवा उपलब्ध करून दिली जाते, व ही बस मंदिराच्या जवळ गणपती मंदिरापर्यंत जाते, मात्र आपल्या दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन येणाऱ्या वाहन चालकांना व भाविकांना मंदिरापासून सुमारे एक किलोमिटर लांब असलेल्या पार्किंग मैदानावर गाडया पार्क करून तेथून चालत दर्शनासाठी जावे लागते. त्यामुळे महिला, वयोवृध्द भाविक व लहान मुले यांना याचा त्रास होतो. पोलीस गाडया खाली सोडत नसल्याने कधी कधी वादावादीही होते. मात्र गाडया वर लावून खाली मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची ये जा करतान चांगलीच दमछाक होते.
तर राजापूर शहरातुन श्री देव धुतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता हा अरूंद असल्याने छोटया दोन गाडया कशातरी काही ठिकाणी एकमेकांना बाजू देणे शक्य होत असल्याने ये जा करतात, मात्र एखादी मोठी गाडी आली तर मात्र कमालीची वाहतुक कोंडी होते. याचाही फटका भाविकांना बसतो.
या एकूणच परिस्थितीचा विचार करता भविष्यात श्री देव धुतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता रूंदीकरण करणे, मंदिर परिसरात भाविकांना जवळ पडेल अशा ठिकाणी पार्किंग सेवा उपलब्ध करणे याबाबत आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी जागा मालकांशी चर्चा करून रस्त्यासाठी जागा मिळविणे, पार्किंगसाठी जागा मिळवणे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
पालकमंत्री ना. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्याने श्री देव धुतपापेश्वर मंदिर सुशोभिकरणाचे काम मार्गी लागले आहे. स्थानिकांनी कायमच विकासाला सहकार्य केले आहे. त्यामुळे भविष्यातील या श्री देव धुतपापेश्वर मंदिर पर्यटन स्थळाच्या सर्वांगिण अशा विकासाचा ध्यास घेऊन काम करताना ना. सामंत व आ. सामंत यांनी या महत्वाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास निश्चितच भविष्यात हा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी राजापूर शहरासह धुतपापेश्वर परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मंदिर प्रशासन यांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसे झाल्यास भविष्यात राजापुरातील हे श्री देव धुतपापेश्वर मंदिर एक सर्व सेवा सुविधांनी युक्त आणि भाविकांचा ओढा वाढविणारे श्रध्दास्थान व पर्यटन स्थळ ठरेल यात शंका नाही.












