गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एस. व्ही. कानिटकर स्मृती व्याख्यानमाला’ संपन्न

‘भारतीय गणितातले संख्यादर्शन’ विषयावर प्रा. सलिल सावरकर यांचे व्याख्यान

रत्नागिरी:
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) गणित विभागातर्फे मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘एस. व्ही. कानिटकर सर स्मृती व्याख्यानमालेचे’ सातवे पुष्प उत्साहात संपन्न झाले. महाविद्यालयाच्या गणित विभागाचे माजी विभाग प्रमुख कै. एस. व्ही. कानिटकर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.

यावर्षीचे प्रमुख वक्ते म्हणून उल्हासनगर येथील श्रीमती चांदीबाई हिंमथमल मनसुखानी महाविद्यालयातील गणित तज्ज्ञ प्रा. सलिल सावरकर उपस्थित होते. त्यांनी “भारतीय गणितातले संख्यादर्शन” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. वैदिक संस्कृती आणि मध्ययुगीन भारतीय ग्रंथांमध्ये संख्या दर्शवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट शब्दांचे आणि पद्धतींचे विवेचन त्यांनी विविध सोप्या उदाहरणांद्वारे मांडले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने गणित विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एम.एस्सी. वर्गातील विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवलेल्या पाठांतून ‘उत्कृष्ट शिक्षक’ म्हणून स्वाती अंग्रोळकर (प्रथम) व नम्रता माने (द्वितीय) यांना गौरवण्यात आले. तसेच, तृतीय वर्ष गणित विषयाच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल शिवान कीर, पलाशा सामंत आणि कावेरी जंगम या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे यांनी भूषविले. त्यांनी कानिटकर सरांच्या स्मृतींना उजाळा देत गणिताची जागतिक व्याप्ती स्पष्ट केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी झाला.

याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ. दिवाकर करवंजे आणि प्रा. श्रद्धा सुर्वे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी पटवर्धन यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती अंग्रोळकर या विद्यार्थिनीने केले. शेवटी प्रा. स्पृहा जोशी यांनी आभार मानले.