खेड रेल्वे स्टेशन येथे शिवजयंती व गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

खेड (प्रतिनिधी) : खेड रेल्वे स्टेशन परिसरात शिवसेना पक्ष प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेना – रिक्षा संघटना यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाजोपयोगी उपक्रमास नागरिक, रिक्षाचालक, युवक व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिवरायांच्या विचारांना अभिवादन करत “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवला. सार्वजनिक ठिकाणी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती व नवंचित जिल्हा परिषद सदस्य मा. श्री अरुण (अण्णा) कदम साहेब, शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री शशिकांतजी चव्हाण साहेब, खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष श्री सतीश उर्फ पप्पू चिकणे साहेब, जिल्हा परिषद सदस्य व खेड शिवसेना तालुका अध्यक्ष श्री सचिनजी धाडवे साहेब तसेच शिवसेना शहर अध्यक्ष श्री कुंदनजी सातपुते साहेब उपस्थित होते.

यावेळी खेड नगर परिषदेचे नगरसेवक निकेतन पाटणे, स्वप्निल सेंतवडेकर, प्रेमळ चिखले, यश खेडेकर, खेड पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, महेश भोसले, महेश जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य सौ. रेवतीताई पाटील तसेच रेल्वे स्टेशनचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत अशा उपक्रमांमधून शिवरायांचे सामाजिक न्याय, कर्तव्यभावना आणि सेवाभावाचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवले जात असल्याचे मत व्यक्त केले. या रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध होण्यास मदत झाली असून, शिवजयंती व गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक दायित्व जपणारा हा उपक्रम खेड शहरात विशेष चर्चेचा विषय ठरला.