खेड (प्रतिनिधी) : नयनबिंदू सभागृह, घराडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या पुस्तकाच्या ब्रेल रूपांतरण प्रकाशन सोहळ्यात खेड येथील प्रसिद्ध निवेदक व सूत्रसंचालक उत्तमकुमार जैन यांचा उत्कृष्ट निवेदन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे खेडसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), मालवण शाखेच्या वतीने आयोजित या साहित्यिक आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर यांच्या हस्ते उत्तमकुमार जैन यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित साहित्यिक, मान्यवर आणि रसिकांनी त्यांच्या ओघवत्या, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी निवेदनशैलीचे विशेष कौतुक केले.
उत्तमकुमार जैन यांनी गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचालन आणि निवेदनाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार भाषा, विषयाची सखोल जाण, प्रसंगानुरूप मांडणी आणि श्रोत्यांशी सहज संवाद साधण्याची त्यांची शैली ही त्यांच्या निवेदनाची खास वैशिष्ट्ये मानली जातात. याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
दरम्यान, ‘शब्दांच्या पलीकडले’ या पुस्तकाचे ब्रेल रूपांतरण प्रकाशित करून दृष्टिहीन बांधवांसाठी ज्ञान आणि साहित्याची नवी दालने खुली करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम या कार्यक्रमातून साकारण्यात आला. साहित्य, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यात उत्तमकुमार जैन यांच्या सत्कारामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
या सन्मानाबद्दल साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, हितचिंतक तसेच विविध संस्थांकडून उत्तमकुमार जैन यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.












