काम दर्जेदार करण्याच्या सुचना, वाढीव निधी मंजूर करून देण्याची ग्वाही
राजापूर (प्रतिनिधी): शहरातील ऐतिहासीक ठेवा असलेल्या ब्रिटीशकालीन इंग्रज वखारीच्या सुशोभिकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या सुशोभिरणाच्या कामामुळे या ऐतिहासीक अशा ब्रिटीशकालीन इंग्रज वखारीचे रूपडे पालटणार असून इतिहास प्रेमी व पर्यटकांसाठी हे स्थळ आकर्षण ठरणार आहे. या सुशोभिकरणाच्या कामाची बुधवारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी पहाणी केली.
यावेळी उपस्थित नागरिक व इतिहास प्रेमींनी सुशोभिकरणाच्या कामाबाबत केलेल्या सुचना व बदला प्रमाणे काम केले जाईल असे नमुद करताना यासाठी आवश्यक तो वाढीव निधीही शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही जठार यांनी दिली.
राजापुर शहरातील ऐतिहासीक ठेवा असलेल्या ब्रिटीशकालीन इंग्रज वखारीची पुरती दुरावस्था झाली होती. राजापूर शहराला एक ऐतिहासिक असा वारसा असून छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या ठिकाणी असलेली ही इंग्रजांची वखार शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी लुटली होती.
या वखारीचे अस्तीत्व जपले जावे, ऐतिहासिक खुणा आणि हा ठेवा जपून भावी पिढीलाही याबाबत व या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी माजी आमदार प्रमोद जठार यांनी विशेष पुढाकार घेतला होता. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी या वखारीच्या सुशोभिकरणासाठी शासनाच्या पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत सुमारे दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. यातुन या वखारीच्या सुशोभिकरणाचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये सद्यस्थितीत असलेल्या इमारतींची डागडुजी आणि सुशोभिकरण, परिसराचे सुशोभिकरण आणि या ठिकाणी ऐतिहासिक प्रसंगांचे भित्तीचित्र उभारले जाणार आहेत.
या पहाणी प्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष मोहन घुमे, भाजपा प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस अनिलकुमार करंगुटकर, जिल्हाउपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, प्रसाद पाटोळे, स्वप्नील गोठणकर, शितल पटेल, स्नेहा रहाटे, विवेक गुरव, राजा खानविलकर, प्रसन्न देवस्थळी, प्रकाश घोडेकर, सुनिल खानविलकर, संदीप तेरवणकर ठेकेदार श्री. चव्हाण आदींसह भाजपा पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नागरीकांनी सुरू असलेल्या कामात काही बदल सुचविले, यामध्ये पायऱ्यांना रेलिंग बसविणे, बैठक व्यवस्था, लाईट व्यवस्था अशी कामे सुचविण्यात आली. तर जुन्या वखारीचे जनत करताना त्यासाठी तशा प्रकारे बांधणी करण्याच्या सुचना करण्यात आल्या.
यावेळी आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही देतानाच संबधीत ठेकेदाराला तशा सुचना जठार यांनी दिल्या. तर या वाढीव कामासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या वखारीच्या सुशोभिकरणाचे काम हे दर्जेदार झाले पाहिजे, राजापूरचा हा ऐतिहासिक वारसा पहाण्यासाठी पर्यटक आले पाहिजेत, हे पहाताना छत्रपती शिवरायांचा पराक्रम जनतेला दिसला पाहिजे हा दृष्टीकोन ठेऊन हे काम मार्गी लावण्याचा आपला कटाक्ष असल्याचे जठार यांनी सांगितले.












