वार्ताहर पाली:
पं.स.रत्नागिरी प्रभाग हातखंबा अंतर्गत
शिवजयंती विशेष शिष्यवृत्ती सुपर बॅच सराव परीक्षा व कार्यशाळा नुकतीच पाली शाळा क्र.१ येथे संपन्न झाली. यामधे झरेवाडी,पाली,खानु केंद्र समाविष्ट होती. या उपक्रमाची प्रेरणा विस्तार अधिकारी हातखंबा डॉ. दत्तात्रय सोपनुर यांची असून संकल्पना केंद्रप्रमुख विष्णू पवार यांची होती.
ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थी शोधणे त्यांच्यावरती प्रयोग करणे आणि त्यांना गुणवत्ता धारक करणे या उद्देशाने पं.स.रत्नागिरी,सेस फंड अंतर्गत चार सराव परीक्षा घेण्यात आल्या होत्या या चारही परीक्षातील प्रत्येक केंद्रातील शाळांमधील उत्तम गुणांनी पास झालेली मुले यांची एक सुपर बॅच काढण्यात आली होती .
या बॅचची विशेष परीक्षा शिवजयंतीच्या निमित्ताने पाली केंद्र शाळेमध्ये घेण्यात आली या सुपर बॅचमध्ये २५ विद्यार्थी सहभागी होते.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत पेपर तपासून चुकलेल्या घटकावरती मुलांना अधिक मार्गदर्शन करण्यात आले.परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांचा सभाधीटपणा,आत्मविश्वास, स्थिरता कशी असावी याबाबत केंद्रप्रमुख श्री.पवार यांनी मुलांना छोट्या छोट्या क्लुप्त्या देत मार्गदर्शन केले. मारुती घोरपडे यांनी दोन्ही प्रश्नपत्रिका मधील चुकलेले घटक मुलांना स्पष्ट करून सांगितले. येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये या अभिनव उपक्रमाचा निश्चितच मोठा वाटा असेल.
या सराव परीक्षेत केंद्र शाळा पाली,झरेवाडी,खानु, साठरे न.२,वेळवंड कोठारवाडी, हातखंबा बोंबलेवाडी यांचा सहभाग होता.या शैक्षणिक कार्यशाळेच्या यशस्वी आणि संयोजनामध्ये मुख्याध्यापक जनार्दन मोहिते,झरेवाडीचे रामनाथ बने,खानुचे संजय शेलार, साठरेच्या स्नेहल तेंडुलकर, कशेळीच्या माधुरी शिंदेपाटील,नाणीज गावडेवाडीच्या स्नेहा ठाकरे, सेवानिवृत्त शिक्षक दिगंबर तेंडुलकर या सर्व पदवीधर शिक्षकांनी परीक्षेसाठी सहकार्य केले.











