बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादनाची क्षेत्रीय तपासणी

उत्पादनात ८५ ते ९० टक्क्यांहून अधिक घट; संयुक्त समितीकडून प्रत्यक्ष पाहणी

शिरगाव (प्रतिनिधी) –   हवामानातील बदलामुळे देवगड तालुक्यातील आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर आंबा संशोधन केंद्र गिर्ये व कृषी विभागाच्या संयुक्त समितीने प्रतिनिधिक स्वरूपात प्रत्यक्ष आंबा बागांची पाहणी केली.

या पाहणीत शिरगाव, धोपटेवाडी, शिवरे, विठ्ठलादेवी, फणसगाव, बापर्डे, वाघोटण व गिर्ये येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांची संबंधित शेतकऱ्यांच्या समवेत सविस्तर तपासणी करण्यात आली.

यावेळी र्आंबा बागांची पाहणी करताना वातावरणातील बदलामुळे यंदा आंबा उत्पादनात दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत अंदाजे ८५ ते ९० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे स्पष्ट झाले.

डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात मोहर आला होता; मात्र परागीभवन (संयुक्त परागण) अत्यल्प झाल्यामुळे अपेक्षित फलधारणा होऊ शकली नाही. तसेच जानेवारी महिन्यात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे व हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे मोहर करपून (सुकून) गेला. परिणामी दुसऱ्या टप्प्यातील फलधारणाही झालेली नाही.

याशिवाय फुलकिडी व तुडतुडा या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला. शेतकऱ्यांनी विविध कीटकनाशकांचा वापर करून किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी बदलत्या हवामानामुळे झाडांवर अपेक्षित फलधारणा झालेली नाही.

या नैसर्गिक बदलांमुळे यंदाच्या हंगामात आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. हा अहवाल जिल्हा कृषी कार्यालयात पाठविण्यात आला.

या पाहणीत कीटकशास्त्रज्ञ तथा आंबा संशोधन केंद्र गिर्ये येथील मा. डॉ. अजय मुंज, मा. डॉ. रणजीत एम. देव्हारे, सहयोगी प्राध्यापक, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे (जि. सिंधुदुर्ग), मा. उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली श्री. उमाकांत पाटील, मा. तालुका कृषी अधिकारी देवगड श्रीम. आरती पाटील, उपकृषी अधिकारी शिरगाव श्री. बापूराव लांबाडे, उपकृषी अधिकारी वाघोटण श्री. संभाजी जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सचिन पडघान, श्री. गुरुनाथ बोडेकर, श्री. मंगेश घनमोडे, श्री. दिनेश लवटे, श्री. रणजीत ढाले यांच्यासह परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.