कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाची जुनी इमारत, गाडी पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने हे कार्यालय संबंधीत विभागाच्या हळवल येथील जागेमध्ये हे कार्यालय स्थलांतरीत करण्याच्यादृष्टीने कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी पुढाकार घेतला. गतवर्षी यासाठीचे प्रयत्न सुरू केल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये हे काम सुरू करण्यात आले. आतापर्यंत पहिल्या मजल्याचे काम अंतिम टप्यात आले असून पुढील महिनाभरात हे कार्यालय हळवल येथे स्थलांतरीत, करण्याच्यादृष्टीने कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली अंतर्गत कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण आदी तालुक्यांच काम पाहिले जाते. मात्र, येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालयाची जागा कमी असल्याने तसेच इमारत जुनी व वाहने पार्किंगसाठी जागा नसल्याने मोठी गैरसोय होते. ज्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे, तेथे सर्व्हिस रोडच्याठिकाणी बॉक्सवेल पूल असल्याने रस्ताही अरुंद आहे. त्यातच अनेकदा ठेकेदारांची वाहने तेथे पार्किंग असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होतो. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय स्वतंत्र जागेत जाण्याची गरज होती.
त्याअनुषंगाने कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी गतवर्षी प्रयत्न करून हळवल येथील ४५ गुंठे जागेच्या ठिकाणी कर्मचारी निवासस्थान असलेल्या मोकळ्या जागेत हे कार्यालय स्थलांतरीत करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या. याबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण करून गतवर्षी एप्रिल – मे महिन्याच्या सुमारास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचीही कार्यवाही पूर्ण करण्यात आली. त्यानंतर ३ कोटी २३ लाख ८७ हजार रुपये खर्चाच्या तळमजला व एक मजला अशा कामाला मंजुरी देत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. साधारणतः डिसेंबर २०२३ मध्ये हे काम सुरू करण्यात आले. तीन महिन्यांत पहिल्या मजल्याचे बऱ्यापैकी काम पूर्णत्वास आले आहे. पुढील महिनाभरात हे काम पूर्ण करून कार्यालय तेथे स्थलांतरीत करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय पुढील महिनाभरात प्रशस्त जागेत स्थलांतरीत होण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.












