कणकवली : विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता व सृजनशीलता वाढीस लावण्यासाठी, टीमवर्कची सवय निर्माण करण्यासाठी आणि कम्युनिकेशन स्किल्स सुधारण्यासाठी सातत्याने विविध प्रकारच्या स्पर्धांना सामोरे जाऊन आपले व्यक्तिमत्त्व सजग करण्याचा प्रयत्न करावा. अशा स्पर्धांकडे केवळ स्पर्धा म्हणून नव्हे, तर परीक्षेपलीकडील शिक्षण म्हणून पाहिले पाहिजे, असे आवाहन डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले.
कणकवली महाविद्यालय येथे आयोजित रसायनशास्त्र विषयावरील जिल्हास्तरीय सेमिनार स्पर्धा ‘कैम फेस्ट’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ही स्पर्धा कणकवली महाविद्यालय व स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड यांच्या रसायनशास्त्र विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र मुंबरकर होते. परीक्षक म्हणून डॉ. महेश साटम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून स. ह. केळकर महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. डी. भेंकी तसेच कणकवली महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. शामराव डिसले उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. शामराव डिसले यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. सी. डी. भेंकी यांनी अशा सेमिनार स्पर्धांचे शैक्षणिक महत्त्व सांगितले, तर परीक्षक डॉ. महेश साटम यांनी प्रभावी सादरीकरण कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, संत राऊळ महाराज महाविद्यालय, श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड व कणकवली महाविद्यालय येथील पदवी स्तरावरील रसायनशास्त्र विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. एकूण आठ गटांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना हरित रसायनशास्त्र, नॅनो रसायनशास्त्र, पर्यावरणीय रसायनशास्त्र, औषध निर्मिती रसायनशास्त्र, पॉलिमर रसायनशास्त्र व दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र असे सहा विषय देण्यात आले होते. निवडलेल्या विषयावर प्रत्येक गटाला सात मिनिटांचे पॉवर पॉईंट सादरीकरण करायचे होते. या स्पर्धेचे परीक्षण एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. महेश साटम यांनी केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक संयुक्तपणे कणकवली महाविद्यालयाच्या दीक्षा मळये, प्रेरणा जाधव तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळच्या सर्वेश रेवडेकर व सिमरन नदाफ यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या हर्षदा परब व कोमल गडम यांच्या गटाला मिळाला. तृतीय क्रमांक कणकवली महाविद्यालयातील सानिका मेस्त्री व भक्ती सावंत यांनी मिळविला.
विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्ती कौशल्य, तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास वाढीस लागावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत गावित यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अविनाश पोरे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रा. महालिंगे, श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचे प्राचार्य कुन्चुरे व उपप्राचार्य सिरसाठे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळचे रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. पीटर रॉड्रिग्ज व आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडीचे रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर सिरसट यांचे सहकार्य लाभले. आयोजनासाठी प्रा. कपिल गडेकर, प्रा. अक्षय जाधव, प्रयोगशाळा सहाय्यक गुरुनाथ सावंत, सचिन भगत व रवींद्र लाड यांनी परिश्रम घेतले.











