नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सहित नगरसेवक आणि कर्मचारी उतरले स्वच्छता मोहिमेत

संतोष कोत्रे | लांजा : लांजा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर यांच्यासहित सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांनी आज सोमवारी सकाळी हातात झाडू घेत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला .यावेळी लांजा चव्हाटा मंदिर ते बाजारपेठ एसटी स्टँड, साटवली तिठ्यापर्यंतचा परिसर हा स्वच्छ करण्यात आला.

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून लांजा नगरपंचायतीच्या पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने संपूर्ण लांजा शहरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एरव्ही लोकप्रतिनिधी हे साफसफाई मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत अशी ओरड केली जाते.‌ मात्र याला छेद देत आज सोमवारी सकाळी लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, गटनेता योगेश कावतकर, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार तसेच नगरसेवक निधी गुरव, नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये, श्रद्धा तोडकरी, सुशीला कांबळे, सिद्धेश भोवड, प्रांजल यादव ,रफिक नेवरेकर ,प्रणाली तेली ,नीलिमा कनावजे, वंदना काडगाळकर, साक्षी मानकर वैभव जोईल ,मनोहर बाईत ,अनिल गुरव , नेहा राडये, स्विकृत नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये आणि सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

या स्वच्छता मोहिमेअंतर्गत लांजा गावचे देवस्थान श्री चव्हाटा मंदिर ते लांजा बाजारपेठ, एसटी स्टँड परिसर ते लांजा साटवली तिठा पर्यंतचा परिसर हा स्वच्छ करण्यात आला.‌ या स्वच्छता मोहिमेत सर्व नगरसेवक आणि नगरपंचायतीचे कर्मचारी देखील उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्यक्ष नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक हे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याने कर्मचाऱ्यांना देखील मोठा हुरूप आला होता.

याबाबत बोलताना उपनगराध्यक्ष बाबा‌ लांजेकर म्हणाले की , लांजा शहराला स्वच्छ सुंदर शहर बनवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाचा त्यात सहभाग असला पाहिजे.‌ प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा.‌ शहराचे विद्रुपीकरण कचऱ्यामुळे होणार नाही याची काळजी नगरपंचायतीबरोबरच प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे.‌ या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने, लांजावासीयाने खबरदारी घ्यावी आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन यावेळी नगराध्यक्षा सावली कुरूप आणि उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर यांनी केले.