​सावंतवाडीतील नूतन मिलाग्रीस चर्चचे ९ मे रोजी लोकार्पण

बिशप अग्नेलो पिनहेरो यांच्याकडून कामाची पाहणी

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी येथील ऐतिहासिक आणि ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या मिलाग्रीस चर्चच्या नूतन इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, येत्या ९ मे २०२६ रोजी या चर्चचे भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग कॅथोलिक धर्मप्रांताचे नवनियुक्त बिशप अग्नेलो पिनहेरो यांनी चर्चला भेट देऊन पाहणी केली.

​ऐतिहासिक वारसा आणि नूतनीकरण
​सावंतवाडीतील मिलाग्रीस चर्चला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. मूळ चर्चची स्थापना १६५२ साली करण्यात आली होती. काळाच्या ओघात जुन्या वास्तूच्या ठिकाणी सुसज्ज आणि भव्य नवीन चर्च उभारण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. हे काम आता अंतिम टप्प्यात असून मे महिन्यात भाविकांसाठी खुले होणार आहे.

​बिशप यांच्याकडून कौतुक
​आपल्या भेटीदरम्यान बिशप अग्नेलो पिनहेरो यांनी चर्चच्या नूतन वास्तूची बारकाईने पाहणी केली आणि अत्यंत देखण्या पद्धतीने करण्यात आलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी स्थानिक फादर आणि ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधून त्यांना आगामी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या.

​मान्यवरांची उपस्थिती
​या पाहणी दौऱ्यावेळी बिशप यांच्यासोबत गोव्याचे बिशप सिमीयाव फर्नांडिस, फादर मिलेट डिसोझा, फा. फॅलिक्स लोबो, फा. रिचर्ड साल्डना, फा. ऑल्वीन गोन्सालवीस, फा. मिल्टन मोल्टेनो, फा. अमृत गोन्सालवीस यांसह चर्च कमिटीचे सदस्य आणि कॅथोलिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सावंतवाडीत उत्साहाचे वातावरण असून, १६ व्या शतकातील हा वारसा नव्या रुपात पाहण्यासाठी सर्वधर्मीय उत्सुक आहेत.
​