खेड (प्रतिनिधी) : कर्तव्य बजावण्यासाठी वैद्यकीय रजेवरून पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी आलेल्या एका शिक्षकाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी, २३ रोजी खेड येथे घडली. धर्मराज नामदेव वाडकर (वय ५६, रा. पाग, ता. चिपळूण) असे निधन झालेल्या शिक्षकाचे नाव असून त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना दुपारी सुमारे १.२६ वाजण्याच्या सुमारास कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराज वाडकर हे जिल्हा परिषदेच्या लोटे माळ येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांच्या वैद्यकीय रजेनंतर ते सोमवारी पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आवश्यक अहवाल व कागदपत्रे सादर करण्यासाठी आले होते.
कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केल्यानंतर ते काही वेळ बसले असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या खासगी डॉक्टरांकडे नेले. प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून गंभीर स्थिती लक्षात घेता त्यांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्वरित हलवण्यास सांगितले.
उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता धर्मराज वाडकर यांचे निधन झाल्याचे घोषित करण्यात आले. कर्तव्यदक्ष, शांत स्वभावाचे आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळख असलेल्या वाडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे सहकारी शिक्षक, विद्यार्थी तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.
धर्मराज वाडकर यांच्या पश्चात पत्नी (गृहिणी) आणि नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेला मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.












