शिवसेना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार- वैभव पवार
देवरूख (प्रतिनिधी)
शिवसेना शिंदे गटाच्या देवरूख शहरप्रमुखपदी उपनगराध्यक्ष वैभव पवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. तर शिवसेना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे नूतन देवरूख शहरप्रमुख वैभव पवार यांनी सांगितले.
देवरूखचे उपनगराध्यक्ष वैभव पवार यांची शिवसेना शिंदे गटाच्या देवरूख शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, बाळासाहेबांना अपेक्षित असलेले ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही विचारधारा जोपासत देवरूख शहरातील सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द राहून पालकमंत्री उदय सामंत यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत शहरात सर्वांना बरोबर घेवून शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माझ्यावर दिलेली जबाबदारी पालकमंत्री उदय सामंत, युवानेते रोहन बने, जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेताना स्व. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम संघटनेच्या माध्यमातून करून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन व पालकमंत्र्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करीन, असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले. मी गेली २० वर्ष समाजकारण करत असताना दहा वर्ष ग्रा. पं. सदस्य नंतर नगरसेवक म्हणून काम केले असल्याने जनतेने मला परत नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. यामुळेच वरिष्ठांनी मला उपनगराध्यक्ष पदासाठी संधी दिली आहे. आता शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दोन्ही पदांचा उपयोग जन सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करून संघटना वाढीसाठी मी कटीबध्द असल्याचा ठाम विश्वास वैभव पवार यांनी व्यक्त केला.












