देवगड : दुचाकीची धडक पादचारी गंभीर जखमी

देवगड / प्रतिनिधी
देवगड- सातपायरी येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी शांताराम शंकर राघव (६५, रा. पुरळ हुर्शी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड सातपायरी येथे पादचारी शांताराम राघव हे रस्ता ओलांडत असताना जामसंडेहून देवगडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेत शांताराम राघव यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी राघव हे सुमारे १५ मिनिटे वेदनेने विव्हळत होते. याचदरम्यान शिवसेनेचे देवगड- जामसंडे शहरप्रमुख तुषार उर्फ पी. टी. पेडणेकर हे घटनास्थळी आले असता त्यांनी जखमी राघव यांना तात्काळ एका रिक्षाचालकाच्या मदतीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी राघव यांना १०८ रुग्णवाहिकेने ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत देवगड पोलीस स्थानकात नव्हती