मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

सावंतवाडी | प्रतिनिधी :- 

दि. २७ फेब्रुवारी रोजी श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असणिये येथे मराठी राजभाषा दिन अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांद्वारे आपली कला व कौशल्ये सादर केली.

कार्यक्रमामध्ये कवितावाचन, संवाद फेक, भाषण आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणातून मराठी भाषेप्रती असलेले प्रेम व अभिमान स्पष्टपणे दिसून येत होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती जान्हवी सावंत मॅडम होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी मराठी राजभाषा दिन का साजरा केला जातो याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच मराठी वाचन व मराठी लेखन शुद्ध असणे आवश्यक असून, हिच आपली मातृभाषा भविष्यात उंच शिखरावर नेईल, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री. राठोड सर तसेच इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले आणि सर्वांनी मराठी भाषेचा गौरव वाढविण्याचा संकल्प केला.