काँग्रेस संघटना बांधणीसाठी तीन दिवसांचे शिबिर!

चिपळूणमध्ये काँग्रेसचे कोकण विभागीय प्रशिक्षण शिबिर सुरू

चिपळूण (प्रतिनिधी):- काँग्रेस संघटना बांधणीसाठी तीन दिवसांचे शिबिर असून काँग्रेसची व संविधानाची जी विचारधारा आहे. त्या अभिनव भारताचा संकल्प या प्रशिक्षण शिबिरात करण्यात येईल. वैचारिक भूमिका लढण्यासाठी आवश्यक असणारा संघर्षाचा ‘ॲक्शन प्लॅन’ या कार्यशाळेतून तयार करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शहरातील धवल मार्केट येथे काँग्रेसचे कोकण विभागीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या हात निशाणीवर लढलेले आणि विजयी व पराभूत झालेले सर्व उमेदवार सहभागी झाले आहेत. याशिवाय नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांचा सहभाग आहे.

यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, राजापूरच्या नगराध्यक्ष हुस्नबानू खलीफे, काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, रमेश कीर, इब्राहिम दलवाई, सुरेश कातकर, चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक साजिद सरगुरोह, सफा गोठे काँग्रेसच्या महिला आघाडी चिपळूण तालुकाध्यक्ष निर्मला जाधव आदी उपस्थित होते.

या शिबिरा संदर्भात प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या. त्यानंतर त्या निवडणुका लढलेल्या उमेदवारांसाठी संपूर्ण राज्यभरात प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याचा शुभारंभ कोकणातील चिपळूणमध्ये होत आहे. यावेळी काँग्रेसला कोकणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही. या प्रश्नावर ते म्हणाले आघाडीच्या राजकारणात काँग्रेसची थोडी पिछेहाट झाली. भारतात १९९९ पासून आघाडी युती अपरिहार्य ठरत गेली आणि तशा परिस्थितीत आम्ही लढत नाही म्हणून संघटना बांधणीकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले अशी कबुली देत देशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, संघटना बांधणीसाठी मर्यादा आल्याने आमच्याजवळ सक्षम उमेदवार देखील नव्हते, अशी स्थिती मध्यंतरीच्या काळात निर्माण झाली. ही स्थिती बदलण्यासाठी आम्ही संघटना बांधणीवर भर देत आहोत. आणि त्यासाठी हे प्रशिक्षण आहे. या शिबिराचे नियोजन काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली उत्तमपणे झाले आहे. याबाबत या शिबिरासाठी आलेल्या काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी व उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे.