खेड (प्रतिनिधी) : २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन आणि कविवर्य विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त चंदी हवेली कळंबणी येथे मराठी भाषेचा गौरव करणारा ‘मराठी भाषा स्वरसंध्या’ हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हॅपी ढाबा समोर, मुंबई–गोवा महामार्गालगत आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेले स्थानिक लेखक, साहित्यिक, कवी-कवयित्री, मराठी विषयाचे प्राध्यापक-शिक्षक तसेच पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठी कविता वाचन, मराठी भाषा लेखन, तसेच मराठी भाषेचे जतन व संवर्धन या विषयांवर सखोल चर्चा यावेळी करण्यात आली. मराठी भाषेचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या कविता आणि विचारमंथनाने उपस्थित रसिक भारावून गेले.
मराठी साहित्य क्षेत्रासाठी विशेष योगदान दिलेल्या श्रीमती वैशाली कवळे, उत्तमकुमार जैन, बाळासाहेब राऊत, सौ. दीप्ती दिलीप यादव, अनघा तोडकरी, श्री महादेव ज्ञानदेव वाघमोडे, श्री विजय शिंदे, राज भिंगारे, दिनेश काशीराम पवार, मनीष कदम, श्याम शिर्के, जयवंत नारायण चव्हाण, राजकुमार मगदूम, विजय श्रीधर शिंदे, तुषार सागवेकर, पूर्णिमा प्रविण पवार, रूपाली महादेव पाटील, परेश खोपडे आदी मान्यवरांनी आपल्या उपस्थितीतून व सहभागातून मराठी राजभाषेचा गौरव केला.
कार्यक्रमाला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक व गटनेते रहीम भाई सहिबोल, जिल्हा चिटणीस भालचंद्र उर्फ नंदू साळवी, नगरसेविका सौ. स्वप्नाली राकेश चव्हाण, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, वैजेश सागवेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष नईम चौगुले, राकेश चव्हाण, स्वप्निल नरळकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती, ओळख आणि अस्मिता असल्याचे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले. अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले गेले तर मराठी भाषेचे संवर्धन अधिक प्रभावीपणे होईल, असा आशावाद व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












