उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑनलाइन उपस्थिती
‘गाव तिथे उद्योजक’ उपक्रमाचे कौतुक
मसुरे | झुंजार पेडणेकर
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या नूतनीकृत ‘एकनाथ ठाकूर अध्यक्षीय दालन’चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी केले.
या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
राज्याच्या अधिवेशनामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. महाराष्ट्र चेंबरला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देत शताब्दी वर्ष गाठणे ही अत्यंत अभिमानास्पद व ऐतिहासिक कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीत चेंबरचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत संस्थेचे अभिनंदन केले.
अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या “गाव तिथे उद्योजक” या संकल्पनेचे विशेष कौतुक करत प्रत्येक गावातून उद्योजक घडविण्याचा हा उपक्रम राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात उद्योगनिर्मिती वाढल्यास स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र चेंबरला आवश्यक ती सर्वतोपरी मदत शासन स्तरावरून केली जाईल व शासन ठामपणे पाठिशी उभे राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
दावोस दौऱ्याचा आढावा देताना राज्यात विक्रमी प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होत असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रासाठी नव्या पर्वाची सुरुवात होत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या सोहळ्यास राज्याचे गृह (ग्रामीण ), शालेय शिक्षण, सहकार, गृहनिर्माण आणि खाणकाम राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी अध्यक्ष हेमंत राठी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय सोनवणे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब, शंकर शिंदे, संगीता पाटील, प्रफुल्ल मालाणी, राज्य मुख्य समन्वयक वेदांशु पाटील, सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. पंकज भोईर म्हणाले, “गाव तिथे उद्योजक” हा अध्यक्ष माणगावे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला स्तुत्य उपक्रम असून राज्याला अशा उपक्रमाची गरज आहे. उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रात काम करणारे आणि सरकार यांच्यातील महाराष्ट्र चेंबर हा महत्त्वाचा दुवा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात उद्योगाला पोषक वातावरण निर्माण झाले असून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक उद्योग निर्मितीत चेंबरने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

प्रमुख पाहुणे महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष व एम्पायर स्पायसेस अँड फूडचे हेमंत राठी म्हणाले की, महाराष्ट्र चेंबरने आम्हाला मोठे केले. एकनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या नावाने दालन उभे राहणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष रवींद्र माणगावे म्हणाले, स्व. एकनाथ ठाकूर यांनी उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रात भरीव काम केले. त्यांनी स्थापन केलेली सारस्वत बँक आज देशातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. त्यांनी अनेक उद्योजक आणि कार्यकर्ते घडवले. त्यांच्या विचारांच्या पायावरच महाराष्ट्र चेंबरची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. एखादा अपवाद वगळता महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी कार्य केलेल्या मान्यवरांनी आजवर कधीही धर्म, जात-पात, भाषा किंवा खानपान याबाबत भेदभाव न करता राज्याच्या औद्योगिक विकासासाठी भरीव योगदान दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विश्वस्त मंडळाच्या चेअरमन आशिष पेडणेकर यांनी सांगितले की, स्व. एकनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत कार्यरत राहिल्यामुळेच यश मिळाले. महाराष्ट्र चेंबरच्या प्रगतीत ठाकूर यांचा मोठा वाटा असून त्यांच्या नावाचे दालन उभे राहणे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, या सोहळ्याला कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र चेंबरचे जीसी सदस्य, आणि 300 पेक्षा अधिक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियुक्तीपत्रांचे वितरण
या सोहळ्यात महाराष्ट्र चेंबरच्या विविध समित्यांवर नियुक्त झालेल्या पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यात जयेश श्रीकृष्ण परब, सोनाली गुंजाळ, शेखर घोडके, सुजान सिंग कुमरे , दीपाली चांडक, गौरव सोमवंशी, संतोष राणे, मनोज भोसले, किरण भोसले, तेजस्वी राव, शामिका नाडकर्णी, अण्णासाहेब पाटील, विश्वजीत मोटे, रामेश्वर पवार आदींचा समावेश होता.











