मराठी भाषेचा सन्मान… चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज

खेड प्रतिनिधी :
मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निगडे येथे एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी सामाजिक उपक्रम पार पडला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीने शाळेतील गरीब व निराधार विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज दिसून आले आणि मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी भाषेचे सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. बदलत्या काळात मराठी शाळांमधील कमी होत चाललेली पटसंख्या ही चिंतेची बाब असून मराठी भाषा आणि मराठी शिक्षण टिकवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी क्लबचे सदस्य, साहित्यिक व पत्रकार उत्तम कुमार जैन यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम, अभिमान आणि आत्मविश्वास बाळगण्याचे महत्त्व पटवून दिले. मराठी शाळा या केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नसून त्या संस्कारांचे मंदिर असल्याचे सांगत, मराठी भाषा आणि मराठी शाळा या दोन्ही जपल्या गेल्या पाहिजेत, अशी भावनिक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, खजिनदार श्री. लोहार, माजी अध्यक्ष रोहन विचारे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बेलोसे, पदवीधर शिक्षिका स्वाती राठोड, उपशिक्षक कासार सर तसेच माजी सरपंच श्री. मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूंचाच आधार मिळाला नाही, तर मराठी भाषेबद्दलचा अभिमान, आत्मविश्वास आणि प्रेरणाही मिळाली. मराठी भाषा जपण्याचा आणि पुढील पिढीपर्यंत तिचे महत्त्व पोहोचवण्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला.