मुंबईतील मोर्चासाठी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी १६ कामगार संघटनांनी कंबर कसली असून, येत्या १० मार्च रोजी विधिमंडळ अधिवेशनावर भव्य ‘निर्धार मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चात सिंधुदुर्गातील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले आहे.
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार आणि वारसांची महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, ऑफिस सेक्रेटरी सूर्यकांत बांदलकर, जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतच हवीत घरे; शेलू-वांगणीचा पर्याय अमान्य
उपस्थितांना मार्गदर्शन करताना बजरंग चव्हाण म्हणाले की, “गिरणी कामगारांना मुंबईबाहेर शेलू किंवा वांगणी येथे घरे नको आहेत, तर ती मुंबईतच मिळायला हवीत. या मागणीसाठी १६ संघटनांनी एकत्र येत लढा तीव्र केला आहे. आतापर्यंत १ लाख ७० हजार कामगार व वारसांनी घरांसाठी अर्ज केले असून, त्यापैकी १ लाख २५ हजार अर्ज छाननीनंतर पात्र ठरणार आहेत. १ ऑक्टोबर १९८१ च्या संपातील सहभागी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”
संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई म्हणाले, “मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात गिरणी कामगारांचा मोठा वाटा आहे. ज्या कामगारांनी देशाला कोट्यवधींचे कापड दिले, त्यांना आज घरासाठी वाऱ्यावर सोडणे अन्यायकारक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४० कोटी जनतेचे नेतृत्व करताना गिरणी कामगारांच्या आशीर्वादाकडे दुर्लक्ष करू नये. मुंबईत १०० टक्के घरे देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी हा प्रश्न तात्काळ सोडवावा.”
घोषणाबाजीने सभागृह दणाणले
या सभेदरम्यान गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी जोरदार घोषणाबाजी केली. या मेळाव्याला सुमारे १५० हून अधिक कामगार आणि वारस उपस्थित होते. सुरेखा भिसे, लॉरेन्स डिसोझा, सुमन मुळीक, सतीश निकम, रामचंद्र कोठावळे, महादेव सावंत यांनीही आपली मते मांडली. यावेळी व्यासपीठावर सुभाष परब, विश्वनाथ कुबल, गणपत गावडे, सोनू दळवी, सुभाष नाईक, गोविंद पालव, रेखा लोंढे-देसाई, मुकुंद बाईत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार अभिमन्यू लोंढे यांनी मानले.
१० मार्चच्या मुंबईतील मोर्चात सहभागी होऊन आपली एकजूट दाखवून देण्याचा निर्धार यावेळी सावंतवाडीतील कामगारांनी व्यक्त केला.












