खेड : प्रतिनिधी
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा गजरात खेड शहरात आज पाच दिवसांच्या गौरी–गणपतींचे विसर्जन जल्लोषी वातावरणात पार पडले. शहरातील जगबुडी व नारंगी नदीच्या विसर्जन घाटावर मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी करून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.

गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांत आगमन झालेले गणपती व गौरी आज भावपूर्ण वातावरणात विसर्जित करण्यात आले. खेड शहरात एकूण १०५८० गणेशमूर्ती व ५५५० गौरीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मुरलीमनोहर गणेशोत्सव मंडळासह शहरातील आणखी पाच सार्वजनिक गणेशमूर्तींचे देखील विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच रिमझिम पावसाचे वातावरण असूनही भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमी नव्हती.
विसर्जन मिरवणुकीत डोल-ताशांच्या गजरात, ढोल-लेझीमच्या तालावर भक्तांनी गणरायाला निरोप दिला. शेकडो गणेशभक्तांनी आपल्या दैवतांची सेवा करून मनोभावे आराधना केली आणि आशीर्वाद घेतला. नंतर जयघोषात व भक्तिभावाच्या वातावरणात विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.
या सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खेड पोलीस ठाण्याच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी दक्षता घेतली असल्याने विसर्जन सोहळा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
पावसाच्या सरींनी भक्तांना थोडा त्रास दिला असला तरी भाविकांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. अखेर मनोभावे आराधना करून गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या विघ्नहर्त्यास निरोप दिला. यासाठी खेड न प सह विसर्जन कट्टा टीमचे सदस्य मोठ्या संख्येने कार्यरत असल्याचे पहावयास मिळाले.













