यूथ गेम्समध्ये खेळाडूंच्या ज्ञानात भर; ‘खो-खो’च्या रंजक इतिहासाने वेधले सर्वांचे लक्ष

चिपळूण –
यूथ गेम्स म्हणजे केवळ मैदानी स्पर्धा, सराव आणि पदकांची चुरस एवढ्यावरच मर्यादित न राहता खेळाच्या मुळाशी नेणारे, त्याची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख करून देणारे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही यूथ गेम्सच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या विशेष माहितीपूर्ण प्रदर्शनाने खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले ते अस्सल भारतीय खेळ ‘खो-खो’चा गौरवशाली आणि प्रेरणादायी प्रवास. या प्रदर्शनात खो-खो खेळाची केवळ नियमावलीच नव्हे, तर या खेळाचा उगम, त्यामागील पारंपरिक वारसा, कौशल्यांची शिस्त, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाला ओळख मिळवून देणाऱ्या दिग्गज खेळाडूंचा इतिहास सविस्तरपणे मांडण्यात आला आहे. जुनी छायाचित्रे, महत्त्वाचे टप्पे आणि आतापर्यंतचे उल्लेखनीय विक्रम पाहताना अनेक उदयोन्मुख खेळाडू भारावून गेले.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ माहितीफलकांपुरते प्रदर्शन न ठेवता, चित्रफितींच्या माध्यमातून खेळाडूंचे प्रबोधन केले जात आहे. यामुळे खेळाचा इतिहास, तंत्र आणि जागतिक स्तरावरील बदल समजून घेणे खेळाडूंना अधिक सोपे झाले आहे. यापूर्वीच्या यूथ गेम्समध्ये जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि स्विमिंग या खेळांची अशीच रंजक आणि अभ्यासपूर्ण माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली होती. त्या चित्रफितींमुळे खेळाडूंना संबंधित खेळातील तांत्रिक बारकावे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य आत्मसात करण्याची दिशा मिळाली आहे.
केवळ स्पर्धांचे आयोजन न करता खेळाडूंना वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या उद्देशाने हे अभ्यासपूर्ण प्रदर्शन दरवर्षी भरवले जाते. आपल्या आवडत्या खेळाची पाळेमुळे नेमकी कुठे आहेत, त्याचा प्रवास कसा घडला आणि आजच्या टप्प्यापर्यंत तो कसा पोहोचला, हे जाणून घेण्याची संधी या माध्यमातून खेळाडूंना मिळत आहे. ‘अभ्यासपूर्ण प्रदर्शन’ ही आता यूथ गेम्सची एक वेगळी आणि सकारात्मक ओळख बनत चालली असून यंदाही प्रदर्शनाला मिळालेली खेळाडूंची गर्दी याचे स्पष्ट उदाहरण ठरली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना खो-खो खेळाचे मार्गदर्शक विनोद मयेकर म्हणाले की, मैदानावर खेळताना खेळाडूंना मुख्यतः सराव आणि तंत्रावर लक्ष केंद्रित करावे लागते. मात्र अशा प्रदर्शनांमुळे खेळाचा इतिहास, त्यामागील संस्कृती आणि मूल्ये समजतात. खो-खोसारख्या भारतीय खेळाचे बारकावे जवळून पाहिल्यानंतर येथे सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
यूथ गेम्समधील हे माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी प्रदर्शन खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, खेळाबद्दलची जाणीव आणि अभिमान अधिक दृढ करणारे ठरत आहे.