पत्रकार कक्षाचे तत्काळ नुतनीकरण : इतर सुविधाही उपलब्ध करणार
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यातील पत्रकारांच्या प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या हक्काच्या ‘पत्रकार भवनाचा’ प्रश्न मार्गी लावण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार. यासोबतच शहरातील विद्यमान पत्रकार कक्षाचे नूतनीकरण करून तिथे तातडीने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिली. सावंतवाडी नगर परिषदेच्या पत्रकार कक्षाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ॲड. निरवडेकर बोलत होते. यावेळी त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा स्पष्ट करताना पत्रकार भवन आणि पत्रकार कक्षाच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य दिले.
यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, तालुका पत्रकार संघाचे सहसचिव विनायक गावस, माजी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, जेष्ठ सदस्य राजू तावडे, सागर चव्हाण, पत्रकार अनंत जाधव, जतिन भिसे, सिद्धेश सावंत, प्रा. रुपेश पाटील, आनंद धोंड, भुवन नाईक यांच्यासह प्रिंट आणि सोशल मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांच्या प्रश्नांची तड लावणार
नगराध्यक्ष निरवडेकर म्हणाले की, “पत्रकारांसाठी सर्व सोयींनी युक्त असे भवन उभारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक तो निधी आणि सहकार्य मिळवून दिले जाईल. तसेच, सध्याच्या पत्रकार कक्षात तातडीने सुधारणा करण्यासाठी आगामी स्थायी समितीच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल.”
शहराच्या विकासाचे ‘व्हिजन’ व पार्किंगसाठी ‘गोवा पॅटर्न’
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पणजी (गोवा) च्या धर्तीवर मल्टीलेव्हल पार्किंग उभारण्याबाबत प्रशासन विचार करत आहे. तसेच रस्त्यांवर पांढरे पट्टे मारून शिस्तबद्ध पार्किंग झोन निश्चित केले जातील. व्यापाऱ्यांशी चर्चा करून काही भागात ‘वन-वे’ वाहतूक सुरू करण्याचा मानस आहे. नगर परिषदेच्या मागील मोकळ्या जागेचा वापरही पार्किंगसाठी केला जाईल.
मोती तलाव संवर्धन आणि वृक्षारोपण
ऐतिहासिक मोती तलावाच्या कठड्याला धोका निर्माण करणाऱ्या ३४ जुन्या झाडांऐवजी तिथे १०० नवीन सावली देणारी व फळझाडे लावली जातील. यासाठी स्थापन करण्यात आलेली ‘वृक्ष संवर्धन समिती’ वैज्ञानिक पद्धतीने काम करेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खाजगी रक्षक
शाळा सुटण्याच्या वेळी होणारी गर्दी आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर शाळांना खाजगी सुरक्षारक्षक नेमण्याबाबत नगर परिषद पाठपुरावा करणार आहे. यामुळे वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होऊन विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होईल.
आरोग्य आणि इतर सुविधा:
नगर परिषदेच्या दवाखान्यातील सेवा अधिक सक्षम करण्यासोबतच, अग्निशामक दलाची इमारत येत्या दीड वर्षात सुसज्ज करण्यात येईल. त्यावर अतिरिक्त मजला बांधून प्रशासकीय कामासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे ते म्हणाले.
”सावंतवाडी शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नगर परिषद प्रशासन आता युद्धपातळीवर काम करत आहे.” — ॲड. अनिल निरवडेकर (प्रभारी नगराध्यक्ष, सावंतवाडी)













