सावंतवाडी शहराच्या विकासाला प्राधान्य द्या परस्पर वाद नको
मोती तलावाच्या संवर्धनासाठी विशेष संघटनेची स्थापना
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी परस्पर वाद व शीतयुद्ध मिटवून सावंतवाडीच्या विकासाला गती द्यावी आणि पाणीपुरवठ्यासह मोती तलावाच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे सकारात्मक आवाहन शिवसेनेचे
जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केले.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या कारभाराविषयी भूमिका मांडताना संजू परब म्हणाले की, लोकप्रतिनिधींमधील समन्वया अभावी शहराचे विकासकाम प्रभावित होऊ नये. वेंगुर्ला नगरपरिषदेप्रमाणे सावंतवाडीतही उत्तम आणि दर्जेदार कामे व्हावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे. विशेष सभेत ‘थर्ड पार्टी ऑडिट’ अहवालावर चर्चा होत असताना उपनगराध्यक्षांनी सभागृहातच भूमिका मांडणे आवश्यक होते. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या दोघांनीही संवादाच्या माध्यमातून मतभेद दूर करून शहराच्या भल्यासाठी एकत्र काम करावे, असे त्यांनी सूचवले.
शहरातील महत्त्वाच्या २८ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ही योजना वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे. कामात कोणतीही अडचण आल्यास प्रकल्पाचा खर्च वाढू शकतो, त्यामुळे कामाची योग्य तपासणी करून अधिकाऱ्यांनी हे काम जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सत्ताधाऱ्यांनी या कामात पारदर्शकता ठेवून नागरिकांना दिलासा द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच, सावंतवाडीचा ऐतिहासिक मानबिंदू असलेल्या मोती तलावाच्या प्रदूषणावर त्यांनी चिंता व्यक्त केली. केवळ दंडात्मक कारवाई करून न थांबता तलावात सांडपाणी जाणे कायमस्वरूपी बंद व्हावे, यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*मोती तलावाच्या संवर्धनासाठी विशेष संघटनेची स्थापना*
मोती तलाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी लवकरच एका विशेष संघटनेची स्थापना केली जाईल. या स्वच्छता अभियानासाठी आमदार दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेस नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी आणि स्नेहा नाईक उपस्थित होत्या.













