नेपोलियन ट्रॉलरला जलसमाधी

मालवण पोलिसांची गस्ती नौका ; गस्ती मार्गांवर किल्ले सिंधुदुर्ग मागे दुर्घटना : ट्रॉलरवरील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात यश

अमित खोत | मालवण : मालवण समुद्रात शनिवारी दुपारी जीवघेणा थरार घडला. या थरारक दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या यां दुर्घटनेत पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला (ट्रॉलर) जलसमाधी मिळाली. गस्ती मार्गांवर जात असताना किल्ले सिंधुदुर्ग मागे ही दुर्घटना घडली. दरम्यान दुसरी गस्ती नौका स्वयंलीला (ट्रॉलर) तात्काळ त्या ठिकाणी पोहचल्याने सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात यश आले.

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची गस्ती नौका नेपोलियन ट्रॉलर IND MH 5 MM 271 ने मालवण – निवती – वेंगुर्ला या मार्गावर शनिवारी सकाळी निघाली. पोहेको /738 महेश अशोक कदम (निवती पोलीस ठाणे) एएसआय / टी. डी. टेकाळे (कोस्टल), तांडेल बसवराज शेषगिरी, खालाशी अमित राणे, मुत्तु लिंगप्पा हे कर्मचारी गस्ती मार्गांवर रवाना झालेले होते.

समुद्रात 5 तें 6 वाव अंतरावर गस्त घालत असताना दुपारी 12:37 वा. सुमारास ट्रॉलरच्या इंजन रूम मध्ये अचानक पाणी भरण्यास सुरुवात झाली. याबाबत माहिती बोटीवरील कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या गस्ती गस्ती ट्रॉलरला तसेच मालवण पोलीस ठाण्यात दिली.

स्वयंलीला ही दुसरी नौका (ट्रॉलर) समुद्रात काही अंतरावर होती. ती काही वेळातच बुडणाऱ्या नेपोलियन नौकेकडे पोचली. बुडणाऱ्या नौकेवरील सर्व कर्मचारी व खलाशाना सुखरूपपणे स्वयंलीला गस्ती ट्रॉलरवर घेण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, हवालदार मिलिंद पवार, हवालदार वृषाली पाटील, पोलीस कॉस्टेबल संकेत तांडेल, होमगार्ड जॉईल फर्नांडिस यांनी स्थानिक मच्छिमार योगेश तोडणकर यांची बोट घेऊन विली डिसोजा, नॉवेल फर्नांडिस, खलाशी रॉनी, कुमार, लॉरेन्स, बेंडिट व अन्य काही घटनास्थळी पोहचले. बुडणाऱ्या नौकेतून सुरक्षित वाचवलेल्या पोलीस अंमलदार व खलाशी यांना मालवण जेटी येथे आणले.

बुडाणाऱ्या नेपोलियन ट्रॉलर ला वाचवण्याचे प्रयत्न झाले मात्र पुर्णपणे समुद्राचे पाणी आत शिरल्याने नेपोलियन ट्रॉलर ला जलसमाधी मिळाली.