दोन वाहनांना ४ हजारांचा दंड
सावंतवाडी :
सावंतवाडी शहरात अनधिकृत नंबर प्लेट आणि वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावून फिरणाऱ्या वाहनांवर सावंतवाडी पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन वाहनांवर गुन्हे दाखल करत त्यांना तब्बल चार हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी शहरात नियमबाह्य नंबर प्लेट्स आणि काळ्या काचा असलेल्या गाड्या सर्रास वावरत असल्यामुळे अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. शुक्रवारी भरदिवसा बाजारपेठेत अशा गाड्या फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ पावले उचलत या वाहनांना रोखले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
या कारवाईदरम्यान अजय सूर्यकांत कवठणकर यांच्या -12-ML-4008 या क्रमांकाच्या वाहनावर अनधिकृत नंबर प्लेटप्रकरणी १ हजार रुपये आणि काळी काच वापरल्याबद्दल १ हजार ५०० रुपये असा एकूण २ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच गणपत माईणकर यांच्या mh -07-AS-5193 या वाहनावर अनधिकृत नंबर प्लेटप्रकरणी १ हजार रुपये व काळी काच वापरल्याबद्दल ५०० रुपये असा एकूण १ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
कारवाईच्या वेळी पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या काचांवर लावण्यात आलेली नियमबाह्य काळी फिल्म जागीच काढून टाकली. शहरात यापुढेही वाहनांवर नियमबाह्य नंबर प्लेट तसेच काळ्या काचा वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात अशीच कडक आणि धडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिला आहे.













