सुरक्षित असल्याचा व्हाट्सअप मेसेज आल्याने हितचिंतकांचा जीव भांड्यात पडला
देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे सध्या पत्नी सौ. ज्योती यांच्या सोबत दुबई येथे गेले असताना तेथे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संगमेश्वर तालुक्यात चिंतेचे वातावरण होते. मात्र आज सकाळी दोघांच्याही मोबाईलवरून आम्हाला सुरक्षित एका हॉटेलमध्ये ठेवले असल्याचा मेसेज आला आणि त्यांच्या हितचिंतकांचा जीव भांड्यात पडला.
शुक्रवारी पहाटे ४-४५ च्या विमानाने श्री सुरेश सप्रे व सौ ज्योती दुबईला रवाना झाले. पहिला दिवस जरा बरा गेला. परंतु शुक्रवारी रात्री पासूनच दुबई परिसरात इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे तणाव निर्माण झाला आणि परिस्थिती बदलली. हवाई सेवा बंद झाल्याने अनेकांचे हाल झाले. त्यात देवरूखमधील पत्रकार सुरेश सप्रेही दुबईत असल्याची बातमी पसरली. मोठा जनसंपर्क असणाऱ्या सुरेश सप्रे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु झाला. मात्र दिवसभर संपर्क झाला नाही. काल रात्री एका व्हाट्सअप संदेशाद्वारे त्यांनी सुरक्षित असल्याचे कळवले तर आज सकाळी सौ. ज्योती यांनीही मेसेज करून आमची एका हॉटेलमध्ये व्यवस्था झाली आहे, पुढील सूचना मिळे पर्यंत हॉटेल मध्येच मुक्काम करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेऊ असेही सौ ज्योती यांनी सांगितले. सौ. ज्योती यांच्या या संदेशामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान श्री. सप्रे यांच्या सोबत देवरूखसह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेकजण असून सर्व जण सुखरूप असल्याचे सौ. ज्योती सप्रे यांनी सांगितले.













